जिल्ह्यात घरे, गोठे, दुकाने, सार्वजनिक मालमत्तांचे ३ कोटी १४ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:55+5:302021-05-21T04:32:55+5:30
रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थडकलेल्या ताैउते चक्रीवादळाने जिल्हाभरात अनेक घरांचे पूर्णत:, अंशत: नुकसान केले. गोठे, टपऱ्या, दुकाने, शाळा आणि ...
रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थडकलेल्या ताैउते चक्रीवादळाने जिल्हाभरात अनेक घरांचे पूर्णत:, अंशत: नुकसान केले. गोठे, टपऱ्या, दुकाने, शाळा आणि शासकीय मालमत्ता यांच्या पडझडीने करोडोंचे नुकसान झाले. या सर्वांच्या नुकसानाचा अंदाजित आकडा ३ कोटी १४ लाख २१ हजार ६०८ इतका आहे. जिल्ह्यात सुमारे २५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ४०० झाडांची पडझड झाली. २० बोटींचे नुकसान झाले. या चक्रीवादळात २ व्यक्तींचा मृत्यू झाला, ४ व्यक्ती जखमी झाल्या तर सहा पाळीव जनावरे मृत झाली आहेत.
जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थडकलेल्या ताैउते चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगड, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या किनारपट्टीवरील पाच तालुक्यांमधील गावांना जोरदार फटका बसेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्याचा वेग ताशी ७५ ते १२० किलोमीटर इतका असल्याने किनारपट्टीवरून समांतर रेषेत पुढे जाताना जोरदार वाऱ्यासह अतिवृष्टीचा तडाखा खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा या तालुक्यांमधील अनेक गावांना बसला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, त्याखालोखाल राजापूर तालुक्यात घरांची आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
१८ रोजीपर्यंत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यातील प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १३ घरांची पूर्णत: पडझड झाल्याने ३२ लाख ५२ हजार,७६० रुपयांचे नुकसान झाले आहे. २९१२ घरांची अंशत: पडझड होऊन २ कोटी ४८ लाख २० हजार ७९८ रुपयांचे नुकसान झाले. १६८ गोठ्यांचे २ लाख ७९ हजार ४०० रुपयांचे तर २४ टपऱ्या - दुकानांचे ६ लाख १८ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे. ७३ सार्वजनिक तसेच शासकीय मालमत्तांचे १८ लाख ५१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ३१ शाळांची पडझड झाल्याने ५ लाख ९८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर अंदाजित ३ कोटी १४ लाख २१ हजार ६०८ रुपये इतके नुकसान नोंदविले आहे.
याव्यतिरिक्त अंदाजे २५०० हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून २० बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील प्रत्येकी २०० झाडांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळात ४ व्यक्ती जखमी झाल्या असून २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर ६ पाळीव जनावरे मृत झाली आहेत.
मंडणगडात १३ लाखांचे नुकसान
मंडणगड तालुक्यात ३ पूर्ण आणि २२७ अंशत: घरे, १० गोठे, ३ शासकीय मालमत्ता यांचे १३ लाख २ हजार ७२५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
दापोलीत १ लाख १९ हजारांचे नुकसान
दापोली तालुक्यात ५०९ घरे, २७ गोठे, २ टपऱ्या यांचे १ लाख १९ हजार ८९५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
खेड तालुक्यात ९ लाख ५५ हजारांचे नुकसान
खेड तालुक्यात १ पूर्ण, ११७ अंशत: घरे, ७ गोठे आणि १ टपरीचे ९,५५,०८० रुपयांचे नुकसान झाले असून, २ व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक पाळीव जनावर मृत झाले आहे.
चिपळुणात साडेदहा लाखांची हानी
चिपळूण तालुक्यात १३३ अंशत: घरे, ४ गोठे, १ शाळा आणि २३ शासकीय - सार्वजनिक मालमत्तांचे १० लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुहागरात ६ लाख ९० हजारांचे नुकसान
गुहागर तालुक्यात २२७ अंशत: घरे, १७ गोठे यांचे ६ लाख ९०हजार २० रुपयांचे नुकसान झाले असून १ व्यक्ती जखमी झाली तर ४ जनावरे मृत झाली आहेत.
संगमेश्वरमध्ये २३ लाख ७६ हजारांची हानी
संगमेश्वर तालुक्यात १५७ अंशत: घरे, १५ गोठे २ टपऱ्या आणि ११ शासकीय तसेच सार्वजनिक मालमत्तांचे एकूण २३ लाख ७६ हजार ७० रुपयांचे नुकसान झाले असून १ व्यक्ती जखमी तर १ जनावर मृत झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यात कोटीपेक्षा अधिक नुकसान, २०० झाडे बाधित
रत्नागिरी तालुक्यात २ पूर्ण, ६७९ अंशत: घरे, २६ गोठे, ११ दुकाने, ६ शासकीय मालमत्ता यांचे १ कोटी ३७ लाख ७४ लाख ८४ रुपयांचे नुकसान झाले असून तालुक्यात २०० झाडे बाधित झाली आहेत.
लांजा तालुक्यात २७.५० लाखांचे नुकसान
लांजा तालुक्यात ३ पूर्ण आणि १८७ अशंत: घरे, १६ गोठे आणि ३ शासकीय मालमत्तांचे मिळून एकूण २७ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यात ३४ शाळा बाधित
राजापूर तालुक्यात ४ पूर्ण, ६७६ अंशत: घरे, ४६ गोठे, ८ टपऱ्या - दुकाने, २७ शासकीय, सार्वजनिक मालमत्तांचे मिळून एकूण १ कोटी ३ लाख १७ हजार ५७१ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात २०० झाडे, ३४ शाळा बाधित झाल्या असून ३ व्यक्ती जखमी झाल्या आहेत.