धरण झाले तरीही पाण्याचा दाह

By Admin | Published: May 17, 2016 09:42 PM2016-05-17T21:42:11+5:302016-05-18T00:07:06+5:30

राजापूर तालुका : पूर्व परिसरातील मध्यम प्रकल्पावर १० वर्षांत ५०० कोटींचा खर्च

Damage to water even after dam | धरण झाले तरीही पाण्याचा दाह

धरण झाले तरीही पाण्याचा दाह

googlenewsNext

राजापूर : धरण बांधून पूर्ण झाले. पण, त्यातून काढावयाच्या कालव्यांच्या कामाला गती नाही. त्यामुळे पावसाळी दिवसात तुडुंब धरण भरूनही त्यातील पाण्याचा एक टिपूसदेखील तालुक्याच्या पूर्व परिसरवासीयांना मिळालेला नाही, हेच आजचे विदारक चित्र आहे. साधारणपणे नद्यांना येणारे मोठमोठे महापूर रोखणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, अन्नधान्याच्या निर्मितीसह करावयाची वीजनिर्मिती हा धरणे बांधण्याबाबतचा मूळ उद्देश असला तरी कोकणात मात्र प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासह भातशेतीसाठी पाणी हाच मुख्य उद्देश आहे. पण, तोसुध्दा साध्य झालेला नाही. तालुक्यातील सर्वांत मोठा धरण प्रकल्प असणाऱ्या अर्जुनाचे हे चित्र कशाचे द्योतक मानायचे ? सध्या तर हे धरण केवळ पर्यटनस्थळ म्हणून राहिले आहे. राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरात करक व पांगरी या गावात शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाने दहा वर्षांपूर्वी मध्यम प्रकल्प उभारायला सुरूवात केली होती. सुरुवातीच्या काळात ४१ कोटी एवढी अंदाजित खर्चाची रक्कम असलेल्या या प्रकल्पाची मागील १० वर्षाच्या खर्चाची आकडेवारी ५०० कोटीपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पामुळे करक गाव अंशत: तर पांगरी गाव पूर्णत: बाधित झाले आहे. मागील १० वर्षांच्या काळात हे धरण बांधून पूर्ण झाले आहे. एकूण चार ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती उभारण्यात आल्या आहेत. पण, त्या वसाहतींचीही दुरवस्था बनली आहे. मागील पाच वर्षांपासून धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. या प्रकल्पात ७४.६० दशलक्ष घनमीटर म्हणजे २.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा होणार असून, त्यामुळे २३०३ हेक्टर अतिरिक्त पीक क्षेत्र निर्माण होणार आहे. या प्रकल्पावर २०.७५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करण्याचे शासनाचे धोरण आहे. तालुक्याच्या पूर्व परिसरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामध्ये पहिल्या दोन महिन्यातच हे धरण तुडुंब भरते. पण, नंतरच्या काळात आतील पाण्याचा दाब वाढून धरणावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून यासाठी त्या पाण्याचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने आतील पाणी लगतच्या नदीवाटे सोडून दिले जाते. मात्र, त्यानंतर धरणात पुन्हा पाणी साठवायला सुरुवात केली जाते. साधारण शेवटच्या टप्प्यात धरणात पुन्हा पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवायला सुरुवात होते. उन्हाळी दिवसात ठराविक टप्प्याने पुन्हा पाणी सोडले जाते, असा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असून, अद्याप कालव्यांची कामे मार्गी न लागल्यामुळे अशी वेळ आली आहे, हे सत्य बाहेर आले आहे.
या धरणातून उजवीकडे ५७ किलोमीटरचा, तर डावीकडे ६०.९३ किलोमीटरचा कालवा काढला जात असून, त्यांची सुरु असलेली कामे समाधानकारक नाहीत, हेच सत्य आहे. मागील अनेक वर्षे अर्जुनाच्या कालव्यांची कामे मार्गी लावण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच कालव्यांची कामे मार्गी लागलेली नाहीत. काही ठेकेदार तर गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कामाकडे फिरकलेही नव्हते. काहींची कामे सुरु होती, पण ती समाधानकारक नव्हती. त्यातून काही ठिकाणी तर कालव्यांची कामे सुरु असताना झालेल्या खोदाईदरम्यान भूसुरूंगाच्या स्फोटात आजुबाजुच्या घरादारांवर मोठमोठे दगड पडून अनेक घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पण, शासनाकडून त्याची साधी दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आणखी नुकसान होऊ नये, यासाठी कालव्यांच्या खोदकामाचे काम बंद पाडले होते, अशा विविध कारणांनी अर्जुनाच्या दोन्ही कालव्यांची अपूर्ण राहिलेली कामे काही ठिकाणी चालू होती. मात्र, नवीन आर्थिक वर्षात शासनाकडून वेळेवर निधी मिळेल का? याबाबत ठेकेदारांच्या मनात कायम शंका राहिली आहे. (प्रतिनिधी)


शेतकऱ्यांना फायदा नाहीच : अर्जुनाच्या पुनरूज्जीवनाची मोहीम
आता शासनाकडून अर्जुना नदीच्या पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचा येथील जनतेला निश्चित फायदा होणारा आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. आजघडीला हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. अर्जुना प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अजून तरी फायदेशीर ठरलेला नाही.
 

Web Title: Damage to water even after dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.