धरणांमध्ये मुबलक पाणी, विहिरी कोरड्याच
By Admin | Published: April 27, 2016 09:39 PM2016-04-27T21:39:57+5:302016-04-27T23:45:46+5:30
पाण्यासाठी दाहीदिशा : पाणी ना शेतीला ना लोकांना...
रत्नागिरी : जिल्ह्यातील २५ लघुपाटबंधारे प्रकल्पांत ५४ टक्के, तर दोन मध्यम प्रकल्पात ६८ टक्के एवढा मुबलक पाणीसाठा आहे. सिंचनासाठी यातील ५० टक्के पाणीही वापरले जात नसल्याने हे पाणी पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्यांच्या मुखापर्यंत पोहोचविण्याची कोणतीही यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळेच धरणांपासून दूर असलेल्या दुर्गम भागातील जनतेला पाणीटंचाईच्या झळा आता सोसवेना झाल्या आहेत. धरणांमध्ये मुबलक पाणी असून त्याचा काहीच उपयोग नाही. परिणामी जनतेला कोरड्या विहिरी व आटलेल्या नळांकडे पाहातच दिवस ढकलावे लागत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारे धरणांमध्ये असलेला पाणीसाठा ८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकेल इतका आहे. परंतु त्यातील ५० टक्के पाणीही सिंचनासाठी वापरले जात नाही, अशी स्थिती आहे. उरलेले पाणी ना शेतीला ना लोकांना पिण्यासाठी, अशी विचित्र स्थिती आहे. हे पाणी सिंचनासाठी वापरले जात नसेल तर ते किमान तहानलेल्यांसाठी तरी पुरवावे, अशी मागणी याआधीही करण्यात आली होती. परंतु त्याचा गांभीर्याने विचार झालेला नाही. राज्यातील अन्य विभागांपेक्षा कोकणातील पाणीसाठा अधिक दिसून येत असला तरी हा साठा धरणांमध्ये आहे. त्यातील पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही, हे विदारक चित्र समोर आले आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असतानाही त्याकडे पाहण्यापलिकडे जनता काहीही करू शकत नाही, हतबल आहे.
२२ एप्रिल २०१६पर्यंत जिल्ह्यातील नातूवाडी व अर्जुना मध्यम प्रकल्पांमध्ये ६८.१६१ टक्के पाणीसाठा होता. लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मुबलक असला तरी त्यातील काही धरणांमध्येच पाण्याची टक्केवारी चांगली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेले ९ लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर, अडरे, तेलेवाडी, झापडे, बारेवाडी, चिंचवाडी व मुचकुंदी या प्रकल्पांचा समावेश आहे. सहा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षाही कमी साठा आहे. त्यातील निवे प्रकल्पात ५.८८ टक्के, तर फणसवाडीत ७.८६ टक्के एवढा अल्प साठा आहे.
जिल्ह्यात असलेल्या या धरणांच्या जवळच जॅकवेल उभारून जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायती त्यावर नळपाणी योजना राबवत आहेत. ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठी मुबलक आहे त्यांना पाण्याचा तुटवडा नाही. परंतु अनेक प्रकल्पांतील पाणी पातळी घसरल्याने तेथील नळयोजनाही धोक्यात आल्या आहेत. आधीच विहिरी कोरड्या झाल्या आहेत. त्यातच नळही आटत चालल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी वापर होत नसलेले व ज्या काही धरणांत मुबलक असलेले पाणी सर्वसामान्य जनतेला कधी मिळणार, असा सवाला निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)