नृत्यातून होते आनंदप्राप्ती
By admin | Published: May 10, 2016 10:10 PM2016-05-10T22:10:44+5:302016-05-11T00:09:53+5:30
‘प्रयास १००’मध्ये जमेनीस यांचे मत
रत्नागिरी : नियमित सराव व अखंड परिश्रमाने शास्त्रीय नृत्यात नैपुण्य मिळवता येते. नृत्य माझी पहिली आवड आहे. अभिनयामुळे मी २४ तास प्रेक्षकांसमोर राहिले असते, परंतु त्यातून आनंदप्राप्ती झाली नसती. नृत्यातूनच मला खरी आनंदप्राप्ती होते, असे प्रतिपादन नृत्यांगना शर्वरी जमेनीस हिने केले.साईश्री-वेदश्री आयोजित ‘प्रयास १०० प्लस’ कार्यक्रमात शर्वरी जमेनीस बोलत होत्या. एकाच वेळी १३० नृत्यांगनांनी सादर केलेल्या अविष्काराने रत्नागिरीतील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, तर सावनी रवींद्र या गायिकेने सादर केलेल्या गीतांमुळे कार्यक्रमास बहर आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मिताली भिडे यांनी गणेशवंदना, रूपाली भिडे यांनी दुर्गावंदना सादर केली. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
‘नाही कळलं कधी..’, ‘गोऱ्या गोऱ्या गालावर चढली लाली...’ गीते सादर केली. ‘सांज येवो गोकुळी सावळी सावळी गीतावर नृत्यांगनांनी भरतनाट्यम्, कथ्थक नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, रवींद्र घांगुर्डे, गोपाळ जोशी, चंद्रकांत भिडे, शशी भिडे, शशिताई भिडे, प्रवीण मलुष्टे, दीपक साळवी उपस्थित होते. संयोजकांतर्फे मान्यवरांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)