दांडी बहाद्दूर अधिकारी आता रडारवर
By admin | Published: April 17, 2017 06:53 PM2017-04-17T18:53:06+5:302017-04-17T18:53:06+5:30
देवरूख पंचायत समितीच्या मासिक सभेत कारवाईचा ठराव
आॅनलाईन लोकमत
देवरूख, दि. १७ : पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक सभेला विविध विभागांच्या प्रमुखांनी उपस्थित राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.
पहिल्याच सभेत सभापती सारिका जाधव व उपसभापती दिलीप सावंत यांनी यावेळी अधिकारीवर्गाला जनतेच्या एकूणच प्रश्नांबद्दल सूचना करून जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवण्याचे निर्देश दिले.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या मासिक सभेत सभापती सारिका जाधव, उपसभापती दिलीप सावंत, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, सुजित महाडिक, संजय कांबळे, शीतल करंबेळे, सोनाली निकम, प्रेरणा कानाल, निधी सनगले, अजित गवाणकर, पर्शुराम वेल्ये, जया माने, स्मिता बाईत, वेदांती पाटणे उपस्थित होते.
बहुतांश वेळा पंचायत समितीच्या मासिक सभेला पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुखच गैरहजर असतात. अथवा अधिकारी स्वत: उपस्थित न राहता प्रतिनिधी पाठवून वेळ मारून नेतात. यामुळे एखाद्या विषयाचा योग्य खुलासा होत नाही. तसेच एखादी समस्या मार्गी लागण्यास अधिकच विलंब होतो. या साऱ्या बाबींचा विचार करून पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सभेला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याकरिता पहिल्याच बैठकीत कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना आता मासिक सभेला उपस्थित राहाणे अनिवार्य ठरणार आहे.
सुधारित बियाणे व अवजारे यांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये जागृती करून बी- बियाणे सवलतीच्या दराने उपलब्ध करावीत, असे स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन वाढवण्याकरिता खास धोरण ठरवावे, असा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील बहुतांश जनता शेतीवर उदरनिर्वाह करत असून, दररोज लाखो लीटर दूध परजिल्ह्यातून येते, याचा गांभीर्याने विचार करण्याचे सभेत सांगण्यात आले. त्यादृष्टीने मेळावे, शिबिरे आयोजित करून दुग्धोत्पादनाकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना आवश्यक त्या आर्थिक बाबींसह सहकार्य करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. याबरोबरच टंचाईग्रस्त भागातील पाण्याच्या पुरवठ्याबाबत दक्षता घेण्याविषयी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)