परशुराम घाटात दरडीचा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:51+5:302021-05-06T04:33:51+5:30
चिपळूण : मोबदल्याचा गुंता अद्याप सुटला नसल्याने मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम कित्येक महिने रखडले ...
चिपळूण : मोबदल्याचा गुंता अद्याप सुटला नसल्याने मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम कित्येक महिने रखडले आहे. यातच गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात दरड कोसळल्यानंतर मोठा धोका निर्माण झाला होता. थांबलेल्या कामामुळे तेथील परिस्थिती आजही 'जैसे थे' स्थितीत आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातही या दरडींचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, बाधितांच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान व कूळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने परशुराम घाटातील काम स्थगित ठेवण्यात आलेले आहे.
प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नाही. विशेष म्हणजे प्रामुख्याने हा भाग चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. घाटात या रस्त्यावर काही भागात पडलेल्या खड्ड्यांमुळेही धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून त्यावर डांबर टाकणे गरजेचे आहे, अन्यथा पाऊस सुरू झाल्यावर हे खड्डे भरले तर त्याचा कोणताही उपयोग होणार नाही.
घाटातील डोंगरात काही ठिकाणी मोठमोठ्या दरडी रस्त्यालगत आल्या आहेत.
अतिवृष्टीत या दरडी अचानक रस्त्यावर येऊन त्यात मोठा अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याशिवाय दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने महामार्गावरची वाहतूकही कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावरचे खड्डे तत्काळ बुजवावेत व दरडींबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.