चिपळुणातील विठ्ठलाईनगरला पावसाळ्यात धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:53+5:302021-05-30T04:24:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील विठ्ठलाईनगर भागात नैसर्गिक पऱ्याला लागून चार फूट उंचीचा व अडीचशे मीटरपेक्षा जास्त लांब ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील विठ्ठलाईनगर भागात नैसर्गिक पऱ्याला लागून चार फूट उंचीचा व अडीचशे मीटरपेक्षा जास्त लांब अंतरावर संबंधित जमीन मालकाने मातीचा भराव केला आहे. त्यामुळे संपूर्ण विठ्ठलाईनगर पावसाच्या पाण्याने नुकसानग्रस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत नगर परिषदेचे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केली आहे.
शहरातील रमाबाई गोखले हॉलमागे १९८५ पासून घरे बांधण्यात आली आहेत. तसेच ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी परशुरामनगरमधून विठ्ठलाईनगर भागात शालीमार अपार्टमेंटजवळून व बांदल हायस्कूलजवळून वाहत जाते. डोंगर उताराने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत असल्याने मातीच्या भरावामुळे येथील हरधारे घर ते चव्हाण घर याभागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. घरामध्ये कमीत-कमी ३ ते ४ फूट पाणी शिरण्याची शक्यता आहे. या भरावामधून ९०० डायमीटरचे ६ पाईप टाकल्यास विठ्ठलाईनगरला पुराचा होणारा धोका थोडा फार कमी होऊ शकतो. याबाबत स्थानिक नगरसेविका रसिका देवळेकर व संगीता रानडे यांनी मुख्याधिकारी वैभव विधाते यांना धोक्याची पूर्वकल्पना दिली आहे. तरी नगर परिषद प्रशासनाने याची त्वरित दाखल न घेतल्यास पुढील आंदोलनात्मक प्रवित्रा घ्यावा लागेल, अशी भूमिका आरोग्य सभापती मोदी यांनी घेतली आहे.