आरे-वारे होतोय धोकादायक?
By admin | Published: September 11, 2014 10:17 PM2014-09-11T22:17:01+5:302014-09-11T23:03:45+5:30
उपाययोजना हवी : दरडीचा धोका कायम
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे, मालगुंड व जयगड या गावांना जोडणारा जवळचा व रत्नागिरीला जाणारा आरे-वारे मार्ग दिवसेंदिवस धोकादायक होत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गअंतर्गत झालेला जयगड, उंडी, रीळ, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, भंडारपुळेमार्गे आरे-वारे रत्नागिरी हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मार्गावर वाहने कसरत करताना दिसून येतात. यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या तातडीच्या रुग्णाला वा गर्भवती महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सर्वांत जास्त खड्ड्यांचे साम्राज्य भंडारपुळे, नेवरे काजीरभाटी, कासारवेली ते शिरगाव या भागात आहे.
भंडारपुळेतील अरुंद व खड्डेमय रस्ता, तीव्र उतारावरील वेडीवाकडी वळणे तसेच रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते व अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भंडारपुळे ते नेवरे काजीरभाटी या दरम्यान असलेली वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघातात आणखी भर पडत आहे.
भंडारपुळेतील नांदियाच्या डोंगरावरील रस्त्याच्या दुतर्फा दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या देखील आहेत. तसेच आणखी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास व वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गाची संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी पाहणी करुन मार्गातील अडथळे व धोके दूर करावेत, अशी मागणी गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, निवेंडी आदी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)