दापाेलीतील तरुणीची इन्स्टाग्रामवरुन फसवणूक, पुण्यातून तरुण ताब्यात
By अरुण आडिवरेकर | Published: November 24, 2023 11:26 PM2023-11-24T23:26:01+5:302023-11-24T23:26:10+5:30
इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा उठवून दापाेलीतील तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार ११ सप्टेंबर २०२३ राेजी घडला हाेता.
दापाेली : इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा उठवून दापाेलीतील तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार ११ सप्टेंबर २०२३ राेजी घडला हाेता. या प्रकरणाचा दापाेली पाेलिसांनी छडा लावत रमेश भागाेजी काेरके (३२, रा. काेरकेवाडी काेलतावडे, ता. आंबेगाव, पुणे) याला शुक्रवारी (२४ नाेव्हेंबर) ताब्यात घेतले आहे.
दापाेलीतील एका तरुणीला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली हाेती. फ्रेंड रिक्वेस्टमधील व्यक्ती आपलीच मैत्रीण असल्याने तरुणीने ती लगेचच स्वीकारली. त्यानंतर दाेघांमध्ये संभाषण सुरू झाले. थाेड्या वेळाने त्याच अकाउंटवरून तिला एक व्हिडीओ काॅल आला. या काॅलमध्ये एक अज्ञात व्यक्ती आपला चेहरा न दाखवता अश्लील चाळे केले.
त्यानंतर त्या व्यक्तीने अकाउंटवरून तरुणीचे तसेच अज्ञात व्यक्तीचे बनावट फाेटाे तिला व तिच्या इतर मित्र-मैत्रिणींना पाठविले. तसेच सर्व बनावट फाेटाे इंटरनेटवर व्हायरल करण्याबाबत धमकी दिली. या तरुणीने या प्रकाराबाबत आपल्या मैत्रिणीच्या मोबाइल नंबरवर कॉल केले असता आपली मोठी फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने दापोली पोलिस स्थानकात तक्रार दिली हाेती.
याचा तपास दापोली पोलिस व सायबर पोलिस स्थानकातर्फे तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर रमेश भागोजी कोरके याला ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलिस हवालदार शिवलकर व पोलिस कॉन्स्टेबल सातार्डेकर यांनी केली.