दापाेलीला पावसाने झाेडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:18+5:302021-06-11T04:22:18+5:30
दापोली : तालुक्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, गुरुवारी सकाळ दिवसभर पावसाची संततधार सुरू हाेती. मात्र, या ...
दापोली : तालुक्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, गुरुवारी सकाळ दिवसभर पावसाची संततधार सुरू हाेती. मात्र, या पावसाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर दिवसभर कायम राहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टीवरील भागांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी अडीच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले. समुद्राला मोठे उधाण असून, दाभोळ, आंजर्ले, बाणकोट या खाड्या दुथडी भरून वाहत आहेत.
तालुक्यातील पाजपंढरी गावातील सुशीला खले या वयोवृद्ध महिलेचे घर सर्वाधिक धाेकादायक असून, या महिलेचे स्थलांतर करण्यात आले आहे. २५ दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या घरामध्ये एकट्याच राहतात. आपल्या जीवाचे कधीही बरेवाईट होऊ शकते, अशी भीती त्यांच्या मनात कायम आहे. प्रशासनाने स्थलांतराची नाेटीस दिल्यानंतर जायचे काेठे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर हाेता. अखेर प्रशासनाने त्यांची काळजी घेत स्थलांतर केले आहे. त्याचबराेबर हर्णै, पाजपंढरी, उटंबर, आंजर्ले, कळंबट, दाभोळ, आसूद या गावातील धोकादायक कुटुंबांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.