दापोली आगार समस्यांच्या गर्तेत
By admin | Published: July 21, 2014 11:34 PM2014-07-21T23:34:46+5:302014-07-21T23:38:24+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : हेच का बहुजन हिताय बहुजन सुखाय
दापोली : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन सुरु झालेली एस. टी. गरीब व बहुजनवर्गाला सुरुवातीच्या काळात आधारस्तंभ वाटत होती. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे एस. टी. महामंडळाने सुविधा न दिल्याने दापोलीचे एस. टी. आगार विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.
दापोली एस. टी. आगारातील प्रवाशांना अनेक समस्यांसह दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आगारातील प्रवासी शेड प्रवाशांचा मुख्य निवारा असतो. परंतु ही प्रवासीशेडच नादुरुस्त असल्याने झाडावरून अंगावर पाणी टपकावे, त्याप्रमाणे ही प्रवासी शेड पावसात गळू लागली आहे. शेडमध्ये गळती होऊ लागल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी शेडमध्ये मोठ्या प्रमाणात साठत आहे. रात्री - अपरात्री प्रवास करुन आल्यावर शेडमध्ये बसण्यासाठी पुरेशी बाकडी नाहीत. रात्रीच्या वेळी आगारात पिण्याचे पाणी मिळत नाही. दिवसा दुकाने उघडी असल्याने मिनरल वॉटर मिळू शकते किंवा हॉटेलमध्ये जाऊन प्रवासी पाणी पिऊ शकतात. परंतु रात्रीचे काय? एस. टी. आगारातील पिण्याच्या पाण्याचा कुलर आहे. परंतु तो केवळ शोभेसाठी ठेवला आहे. या कुलरचे पाणी एप्रिल, मे महिन्यात प्रवाशांना मिळत नाहीच, शिवाय आता पावसाळ्यातही त्यातून पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दापोली आगारातील सर्वांत मोठी गैरसोय म्हणजे एस. टी. कँटिन होय. येथील कँटिन गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्याचप्रमाणे दापोली ते रत्नागिरी मार्गावरील एस. टी. प्रशासनाची बहुतांश कँटिन बंद आहेत. त्या सुरू कराव्यात. येथील एस. टी. आगाराच्या आवारामध्ये कँटिन नसल्याने प्रवाशांची फार गैरसोय होत आहे. त्यामुळे परगावच्या नाष्टा किंवा भोजनासाठी बाहेरच्या हॉटेलचा पर्याय प्रवाशांना शोधावा लागत आहे.
आगारातील दुर्गंधी ही प्रवाशांची रोजची डोकेदुखी बनली आहे. दापोली एस. टी. आगारातील कॅम्पसमध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्याचबरोबर आगारातील दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरुन बसावे लागते.
आगारात पाऊल टाकताच आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आलोय की काय, असा भास प्रवाशांना होतो. एस. टी. आगारातील कॅम्पसमधे कचऱ्याचे अनेक ढीग आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असून, सुलभ शौचालयाचा वाससुद्धा सर्वत्र येतो. आगारात दत्त मंदिर आहे. या मंदिरात भाविक प्रवासी येतात. परंतु दुर्गंधीमुळे मंदिराचे पावित्र्यही धोक्यात आले आहे.
दापोली एस. टी. आगारात प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. प्रवाशांच्या करमणुकीसाठी टी. व्ही. लावण्यात आला ओह. परंतु हा टी. व्ही.सुद्धा बऱ्याचदा बंद असतो. आगारातील बऱ्याच एस. टी. पावसाळ्यात झाडासारख्या गळत आहेत. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. प्रवाशांना कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कर्मचाऱ्यांनासुद्धा अपुऱ्या सुविधा मिळत असल्याने प्रवाशांप्रमाणे त्यांचीही गैरसोय होत आहे. (प्रतिनिधी)