दापोली नगरपंचायत निवडणूक : सर्वच पक्षांनी भरले सर्व जागांवर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 01:27 PM2021-12-07T13:27:43+5:302021-12-07T13:29:23+5:30
शेवटच्या दिवसापर्यंत आघाडी व युतीबाबतचा राजकीय पक्षांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
दापोली : दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ७ डिसेंबर शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसापर्यंत आघाडी व युतीबाबतचा राजकीय पक्षांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र, अर्ज भरण्याच्या दिवशी काेणाला अधिकृत उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे माेठ्या प्रमाणात बंडखाेरी हाेण्याची शक्यता आहे.
दापोली नगरपंचायत निवडणुकीत शेवटपर्यंत तिढा न सुटल्याने गोंधळ वाढला आहे. या गाेंधळामुळे सर्वच राजकीय पक्षाने १७ पैकी १७ उमेदवारांची तयारी केली आहे. वरिष्ठ पातळीवर शिवसेना - राष्ट्रवादी यांच्यामध्ये आघाडी झाल्याची चर्चा आहे. दाेन पक्षांमध्ये ९ राष्ट्रवादी तर ८ शिवसेना असा फाॅर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे; परंतु राष्ट्रवादीसोबत आघाडी स्थानिक शिवसैनिकांना नको आहे. त्यामुळे शिवसेनेकडून १७ प्रभागात १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही १७ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ऐनवेळी कोणाशी युती व आघाडी होते हे निश्चित हाेणार असून, त्यानंतर कोणत्या उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म मिळतो यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी न दिल्यास बंडखाेरी हाेण्याची दाट शक्यता आहे.
दापाेली नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती व आघाडीबाबत एकवाक्यता हाेत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. काेणता पक्ष काेणाशी हाती मिळवणी करणार याकडे लक्ष लागले आहे. पक्षाचे निश्चित धाेरण ठरल्यानंतर काेणाला अधिकृत उमेदवारी मिळणार हे पाहायचे आहे. त्यानंतर राजकीय घडामाेडींना वेग येणार आहे.