दापोलीत रंगला पालखी महोत्सव
By admin | Published: March 3, 2015 09:18 PM2015-03-03T21:18:56+5:302015-03-03T22:18:54+5:30
‘साईसेवा’चा उपक्रम : लोककला जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न
दापोली : कोकणातील लोप पावत चाललेल्या लोककलांची नवीन पिढीला ओळख व्हावी, पारंपरिक कलेचे प्रदर्शन व्हावे या हेतूने साई सेवा केंद्र दापोलीचे अध्यक्ष सुहास खानविलकर यांनी ८ वर्षांपूर्वी पालखी महोत्सवाची सुरूवात केली होती. गेली आठ वर्षे एकाच ठिकाणी कोकणातील लोककलेबरोबरच विविध देवदेवतांच्या पालख्या नाचवल्या जात आहेत.
शहरातील गाडीतळावरील धर्मशाळेच्या प्रांगणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालख्या सतत गेली आठ वर्षे नाचवल्या जात आहेत. पाऊस कितीही विघ्न आले तरीही भाविक आपल्या देवदेवतांची पालखी घेऊन वाजत गाजत गावातून निघतात. देवदेवतांची पालखी मोठ्या भक्तीभावे दापोलीत आणली जाते. सकाळपासून दापोलीत वाजत गाजत पालख्या यायला सुरुवात होतात. जवळच्या पालख्या सकाळी आदल्या दापोलीत दाखल होतात. मात्र, लांबच्या पालख्या आदल्या दिवशी रात्री मुक्कामी दापोलीत दाखल होतात. सर्व पालख्या दापोली शहरातील मराठा बोर्डिंग येथे एकत्र येतात. येथे पालख्या ठेवून एकत्रित पूजा केली जाते. साईसेवा पालखी महोत्सवात वाऱ्याच्या वेगाने काळकाईदेवी दापोली, देवी पद्मावती वणंद, श्रीदेवी रणभैरी आपटी (मराठवाडी), श्री देव भैरवनाथ ताडील, भैरवनाथ सारंग, श्रीदेव खेम दळखण, श्रीदेवी चंडिका जुने देऊळ खेर्डी, श्रीदेवी चंडिका नवीन मंदिर खेर्डी, श्रीदेवी रण भैरी आपटी, श्रीदेवी महामाई ताडील सुरेवाडी, श्रीदेव धावजी कळंबट, श्रीदेव भैरी साकुर्डे, श्रीदेवी कालेश्वरी आमखोल रावतळे ,श्रीदेव रवळनाथ, रत्नागिरी या पालख्या नाचल्या. (प्रतिनिधी)