दशावतारी कलावंतांचा ‘नाथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:03+5:302021-09-27T04:34:03+5:30
दशावतार ही कोकणची लोककला! बॅ. नाथ पै यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ ला वेंगुर्ले येथे झाला. लहानपणापासून दशावतारी कलावंत, ...
दशावतार ही कोकणची लोककला! बॅ. नाथ पै यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ ला वेंगुर्ले येथे झाला. लहानपणापासून दशावतारी कलावंत, त्यांचे खेळ आणि उत्स्फूर्त अभिनय याने नाथ पै यांच्या हृदयावर गारुड केलेले होते. दशावतारी कलावंताच्या संवादातील उत्स्फूर्तता नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वात आली आणि दशावतारी नाट्यातील दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन आणि सुष्ट प्रवृत्तीची प्रस्थापना या प्रवृत्तीचा नाथ पै यांना आपले संसदीय कार्य प्रभावीपणे मांडण्यासाठी लाभ झाला. बॅ. नाथ पै नेहमी आदराने ‘माझ्यात कला, संगीत, साहित्य यांचे आकर्षण वाढीस लागण्यात माझ्या गावच्या मोचेमांडकर, पार्सेकर, वालावलकर, राठीवडेकर, चेंदवणकर या दशावतारी कंपन्यांचाच मोठा सहभाग आहे,’ असे सांगत.
त्या काळातील अनेक प्रसिद्ध कलावंतांचा नाथ पै यांच्याशी जवळचा परिचय होता. निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान कोठेही दशावतारी नाटक आहे असे नाथ पै यांना समजले तरी ते आपली शेवटची प्रचार सभा आटोपून प्रथम दशावतारी नाट्याकडे धाव घ्यायचे. त्यावेळच्या दशावतारी नटांना आपल्या कंपनीचा दशावतार नाथ पै यांनी पाहिल्याने धन्य वाटायचे! आपला देव आपला खेळ बघायला आला ही त्यांची भावना असायची. त्यांच्या दृष्टीने तो ऑस्कर पुरस्कार असायचा.
‘दशावतारी’ कलेला समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. ते नेहमी म्हणत, ‘माझा कोकणी माणूस दरिद्री असला तरी तो नीतीसंपन्न, चरित्रसंपन्न आहे आणि तो तसा असण्यात माझ्या दशावतारी कलेचा आणि कलावंतांचा वाटा फार मोठा आहे. बहुजन समाजात नैतिक शिक्षणाची जागृती करण्याचे काम दशावतारी नाटकांनी केलेले आहे.’ महाभारत, पांडवप्रताप, हरिविजय आदी निवडक ग्रंथातील नाट्यपुष्पांनी कोकणी माणसाला नीतीपुण्याची जाणीव करून दिली. सरकारने या दशावतारी कलाकारांसाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला.
सरकार काही करीत नसेल तर या दशावतारी बांधवांसाठी मला काही तरी केलेच पाहिजे असे त्यांनी ठरविले. त्यांनी दशावतारी नाट्य स्पर्धा आयोजित केल्या. पहिली स्पर्धा १९६८ ला वेंगुर्ले येथे पार पडली. त्यानंतर अनुक्रमे वालावल, सावंतवाडी येथे स्पर्धा झाल्या. पुढील पाच वर्षांत बॅ. नाथ पै यांना दशावतारी नाट्यमंडळे आणि त्यांचे कलाकार यांच्यासाठी कायमस्वरूपी अशी शासकीय योजना सुरू करावयाची होती. निवडणुकीपूर्वी त्यांनी कलावंतांना तसे वचनही दिलेले होते. मात्र, नियतीच्या मनातील दुर्दैवाचा दशावतार वेगळाच हाेता. १८ जानेवारी १९७१ ला रात्री बेळगाव येथे हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात बोलत असताना बॅ. नाथ पै यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. सर्वांनाच न सोसणारा धक्का बसला होता. कोकणच्या दशावतारी नाट्यातील त्यांचा श्रीकृष्णच कोणाला न सांगता अंतर्धान पावला. त्याने आपला अवतार अचानक संपविला. कोकणचा दशावतार पोरका झाला! त्यांचा नाथ देवाघरी गेला!
आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या शुभारंभास सर्व दशावतारी जुन्या, जाणत्या, वरिष्ठ, ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या नाथच्या आठवणी व्याकूळ करीत असतील एवढे मात्र निश्चित. त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन! दशावतारी कलावंताचा ‘नाथ’! बॅ. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन!
- सुरेश शामराव ठाकूर,
मु. पो. आचरा (मालवण)