धाडसी संकेताची ‘ब्लॅक बेल्ट’पर्यंत मजल! यश रत्नकन्यांचे
By admin | Published: January 18, 2016 11:38 PM2016-01-18T23:38:20+5:302016-01-18T23:38:36+5:30
जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका
मेहरून नाकाडे-- रत्नागिरी स्पीड, पॉवर व परफेक्शन ही तायक्वाँदो खेळाची त्रीसूत्री आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून तिने तायक्वाँदोचे प्रशिक्षण सुरू केले. प्रचंड मेहनत व महत्त्वाकांक्षेच्या जोरावर संकेता सावंत हिने आतापर्यंत १४ सुवर्ण, ३ रौप्य, ३ कांस्यपदके मिळवली आहेत. त्याचप्रमाणे ‘शूट कीक’ ही खासियत असणाऱ्या संकेताची ‘बेस्ट कीक’ ठरली आहे. या खेळातील विविध बेल्ट ग्रेडेशन ए ग्रेडमध्ये पास झाल्यानंतर ती ब्लॅक बेल्टही पास झाली आहे. आता या खेळात पुढे जाण्याचा, करियर करण्याचा संकेताचा मानस आहे.
शहरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये संकेता इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. शालेय शिक्षणाबरोबरच तिने जिल्हा, विभागीय व राज्यपातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश संपादन केले आहे. दहावीचे वर्ष असूनही अभ्यासाकडे किंचितही दुर्लक्ष न करता तायक्वाँदोचा सराव सुरू आहे. मार्शल आर्टमधील हा प्रकार असल्यामुळे या धाडसी खेळाकडे मुलींना पाठविण्यात पालकवर्ग मागे राहतो. मात्र, बदलत्या काळाची गरज व ‘मुलगी’ म्हणून मागे राहू नये, यासाठी संकेताच्या आई-वडिलांनी तिला प्रोत्साहीत केल्यामुळेच तिचा प्रवास सुरू आहे. मिलिंद भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी उपयुक्त पडणाऱ्या विविध सूचना, टीप्स सर देतात, त्याचा उपयोग स्पर्धेवेळी होत असल्याचे संकेताने नम्रपणे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘तायक्वाँदो’ या शब्दाचा अर्थ केवळ हात व पायाच्या सहाय्याने लढण्याची कला! मात्र, यातील विविध कीक्स्चा सराव करावा लागतो. भिंतीवर एका वेळेला २०० शूट कीकचा सराव प्रशिक्षकांनी घेतल्यामुळे अशा प्रात्यक्षिकांमधून नळे सहज फोडू शकत असल्याचे संकेता हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संकेताला ‘बेस्ट फायटर’ अॅवार्डही प्राप्त झाला आहे. आई - बाबांच्या पाठिंब्यामुळेच कराड, जयसिंगपूर, यवतमाळ, कोल्हापूर, औरंगाबाद येथील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळवले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवणे, हे माझे व माझ्या आई-बाबांचे स्वप्न आहे, ते मी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर मेहनतीने नक्की पूर्ण करेन, असेही संकेताने सांगितले.
स्वसंरक्षण ही एक कला आहे. परंतु हीच कला आजच् काळाची गरज बनली आहे. स्वत:बरोबर दुसऱ्याचे संरक्षण करण्यासाठी ही कला प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. संकेताने ही कला आत्मसात केली असून, ती इतरांनाही संरक्षणाचे धडे देत आहे. आजपर्यंतच्या सुवर्णमयी प्रवासात संकेताला जिल्हा तायक्वाँदो संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, तालुका संघटनेचे प्रशांत मकवाना, शाहरूख शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
संकेताने विविध तायक्वाँदो स्पर्धेत मिळविलेले यश
जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेत १४ सुवर्णपदके.
जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेत ३ रौप्यपदके.
जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेत तीन कांस्यपदके.
ब्लॅक बेल्टप्राप्त.
खुल्या तायक्वाँदो स्पर्धेत ‘कॅडेट’ व ज्युनिअर दोन्ही गटात सुवर्णपदक, ‘बेस्ट फायटर’ अॅवार्ड प्राप्त.