डाटा आॅपरेटर्सनी राबविले स्वच्छता अभियान
By admin | Published: November 19, 2014 09:11 PM2014-11-19T21:11:52+5:302014-11-20T00:03:45+5:30
शासनाविरोधात अशीही गांधीगिरी
चिपळूण : नियमितपणे मासिक वेतन मिळण्यासाठी अनेकदा संघर्ष करुनही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील डाटा आॅपरेटर्सना एकदाही वेळेत मासिक वेतन मिळालेले नाही. शासन सेवेत कायम करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरु केलेले ठिय्या आंदोलन आज (बुधवारी) तिसऱ्या दिवशी सायंकाळी स्वच्छता अभियान राबवून संपविण्यात आले. मात्र, कामबंद आंदोलन सुरुच राहणार आहे.
महाआॅनलाईन कंपनीस ग्रामपंचायतीची कामे संगणकीकृत करण्याचा ठेका दिला होता. प्रत्यक्षात शासनाकडून महाआॅनलाईन कंपनीला ८ हजारांचे वेतन दिले असताना आॅपरेटर्सना मात्र ३५०० रुपये व ३८०० रुपये वेतन दिले जाते. तेही वेळेत मिळत नाही. त्यामुळे वैतागलेल्या डाटा आॅपरेटर्सनी मागील महिन्यात बेमुदत कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने बंद मागे घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मागण्यांबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व डाटा आॅपरेटर अध्यक्ष गौरी मालप, रसिका लिबे, आरती साळवी, रुची सुर्वे आदींच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला बसले होते. आज मंत्रालयात ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल मागविला आहे. याबाबत १० दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरु करण्याचा निर्णय डाटा आॅपरेटर्सनी केले आहे. दरम्यान, आॅपरेटर्सनी शासनाविरोधात गांधीगिरी करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)