महापरिनिर्वाण दिनी राष्ट्रपती मंडणगडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:29 PM2021-11-26T13:29:30+5:302021-11-26T13:31:45+5:30
मंडणगड : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळगावी आंबडवे होणाऱ्या सोहळ्यासाठी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित ...
मंडणगड : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळगावी आंबडवे होणाऱ्या सोहळ्यासाठी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याकरिता प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रातांधिकारी शरद पवार, तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, विभागीय पोलीस निरीक्षक काशीद, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता माधव कोंडविलकर, याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी पुरवठा व बांधकाम अधिकारी यांनी आंबडवे येथपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची आणि आंबडवे परिसराची पाहणी केली.
महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाकरिता आंबडवे येथे दोन ठिकाणी स्क्रीन उभ्या करण्यात येणार आहेत. थेट कार्यक्रमासाठी व्यासपीठ व आसन व्यवस्था करण्यात येणार आहेत. आंबडवे येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी कार्यक्रमाचे आयाेजन केले जाते. राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी याठिकाणी उपस्थिती लावतात. यावर्षी देशाच्या राष्ट्रपतींची उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्ताने संसद आदर्श ग्राम योजनेत विशेष बाब म्हणून समाविष्ट केलेल्या आंबडवे गावाच्या पदरात काय पडणार, याकडे लक्ष लागले आहे.
हेलिपॅडसाठी पाहणी
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तीन हेलिकाॅप्टर तालुक्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील शिरगाव येथील मैदानात हेलिपॅड तयार करण्याबाबत यंत्रणाकडून पाहणी करण्यात आली. तसेच आंबडवे येथील स्मारकाचे सुशोभीकरण, पार्किग व्यवस्था याचबरोबर गावातील स्वच्छता अभियानाचे कामही प्रशासनाने हाती घेतले आहे.