Ratnagiri: दाभोळ खाडीत पुन्हा मृत माशांचा खच, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पंचनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:01 PM2023-08-01T12:01:36+5:302023-08-01T12:03:08+5:30
गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगू लागले
चिपळूण : येथील दाभोळ खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळू लागली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील मच्छीमार धास्तावले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (३१ जुलै) पाहणी करत मृत मासे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या खाडीवर मासेमारी हेच तेथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, रविवार (३० जुलै)पासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसू लागले आहेत. दाभोळ खाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली.
त्यानंतर सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. डी. मोरे, क्षेत्र अधिकारी एस. एन. शिंदे, केतकी गावाचे सरपंच महेंद्र भुवड, ग्रामसेवक सूर्यवंशी, तलाठी यू. आर. राजेशिर्के, संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, दिलीप दिवेकर, खजिनदार विजय जाधव, ज्येष्ठ सल्लागार शांताराम जाधव, ग्रामस्थ नितीन सैतवडेकर, उपसरपंच रमेश जाधव, राजाराम कासेकर यांनी केतकी येथे जाऊन पंचनामा केला. मृत मासे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे मासे नेमके कशामुळे मृत झाले आहेत, हे अहवालानंतरच स्पष्ट हाेणार आहे.
खाडीलगतच्या गावांत मासे मृत
भिले, सोनगाव, कोतवली, गोवळकोट, घामणदेवी, मेटे, आयनी, शेरी, गांग्रई, बहिरवली, तुंबाड, शिरसी, शिव, मालदोली, होडखाड, पन्हाळजेसह खाडीलगतच्या गावांत मृत मासे आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अनेक वर्षांनंतर खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळू लागल्याने खाडीत मच्छीमारांच्या दृष्टीने दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे आढळणे हे धक्कादायक आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करून मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळावी. - प्रभाकर सैतवडेकर, उपाध्यक्ष, दाभोळ खाडी संघर्ष समिती.