कळंबस्ते येथे पडक्या विहिरीत सापडला मृतावस्थेत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:21+5:302021-04-13T04:30:21+5:30
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथे पडक्या विहिरीत मृतावस्थेत बिबट्या पडलेला हाेता. - तीन ते चार दिवसापूर्वी बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज ...
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथे पडक्या विहिरीत मृतावस्थेत बिबट्या पडलेला हाेता.
- तीन ते चार दिवसापूर्वी बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज
- गेले दोन दिवस परिसरात कुजकट वास
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सीतारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत साेमवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या सापडला असून, याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. गेले दाेन दिवस या परिसरात कुचकट वास येत हाेता. मात्र, उंदीर किंवा घुस मरून पडल्याच्या शक्यतेने विहीर मालकाने दुर्लक्ष केले. अखेर साेमवारी विहिरीत पाहिले असता बिबट्या दिसला.
साेमवारी वास जास्तच येत असल्याने नेवरेकर यांनी पडक्या विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एक प्राणी पडलेला दिसला. हा बिबट्या असल्याचे कळताच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तो मृत प्राणी बिबट्याच असल्याची खात्री झाली. पाटील यांनी याची माहिती सत्यवान विचारे यांना दिली. विचारे यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला.
कदाचित बिबट्ट्या भक्ष्याचा पाठलाग करत असता विहिरीत पडला असावा व विहीर खोल असल्याने त्याला वर येता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिक वर्तविण्यात येत आहे. नेवरेकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली हाेती.