रत्नागिरीत राेहयाेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:53 PM2024-06-08T13:53:22+5:302024-06-08T13:56:16+5:30
रत्नागिरी : वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उप जिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय ४९) यांच्यावर ...
रत्नागिरी : वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय ४९) यांच्यावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी शहरातील पांढरा समुद्र येथे घडला. हा हल्ला करणाऱ्या दोघांना गेडाम यांनीच चोप दिला असून, शहर पाेलिस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हर्षलता गेडाम शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेमंड रेस्टहाऊसच्या मागील बाजूला असलेल्या मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर ‘मॉर्निंग वॉक’साठी गेल्या होत्या. किनाऱ्यावरून त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या. याचवेळी पांढरा समुद्र येथे दोन सफेद रंगाच्या गाड्या वाळू भरून जात होत्या तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकर वाड्याच्या दिशेने उभा होता. त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.
गेडाम या समुद्राचे चित्रीकरण करत असताना वाळू भरणाऱ्या गाडीतील एकजण त्यांच्या दिशेने आला. त्याने ‘तुम्ही आमच्या गाड्यांचे फोटो का काढताय?’ असे विचारले. यावेळी त्यांनी ‘मी समुद्राचे चित्रीकरण करतेय. तुमच्या गाड्यांचे चित्रीकरण केलेले नाही,’ असे सांगून त्या रेस्टहाऊसच्या दिशेने चालत निघाल्या. त्याचवेळी तिसरी सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीतून दोघे खाली उतरले आणि त्यांनी ‘तुम्ही आमच्या वाळू भरलेल्या गाड्यांचे फोटो काढले आहे, चित्रीकरण केले आहे, तुमचा मोबाइल माझ्याजवळ द्या,’ असे सांगत मोबाइल हिसकावून घेण्यासाठी तो जवळ आला.
त्याचवेळी त्या थोडे मागे आल्या आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर कराटे किक मारली. त्यामुळे तो खाली पडला. हे बघून त्याच्यासोबत असलेली अन्य व्यक्ती गाडीतील फावडे घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावत आली. त्या थोड्या बाजूला झाल्याने ताे तसाच पुढे गेला आणि त्यांनी त्याच्या पाठीमागून किक मारली. हा सर्व प्रकार किनाऱ्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधील काही व्यक्तींनी पाहिला आणि ते धावत तिथे आले. त्याचवेळी गेडाम तिथून निघून आल्या. हल्ला करण्यासाठी आलेल्या गाड्यांचे त्यांनी फोटो काढले असून, ते त्यांनी पाेलिसांकडे दिले आहेत.
हर्षलता गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५२, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शाेध सुरु केला आहे.
वाळूमाफियांशी सामना
उपजिल्हाधिकारी गेडाम या मार्शल आर्ट आहेत. त्यांनी तायक्वांदाेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. या प्रशिक्षणामुळेच त्यांनी गुंडांचा हल्ला धिटाईने परतवून लावला. मात्र, या घटनेने वाळूमाफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.