घराला लागलेल्या आगीत प्रौढाचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:27 AM2019-11-28T00:27:35+5:302019-11-28T00:28:20+5:30
लांजा : सिलिंडरच्या स्फोटाने घराला लागलेल्या आगीत अर्धांगवायूने आजारी असलेल्या ५५ वर्षीय प्रौढाचा जळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी ...
लांजा : सिलिंडरच्या स्फोटाने घराला लागलेल्या आगीत अर्धांगवायूने आजारी असलेल्या ५५ वर्षीय प्रौढाचा जळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना लांजा तालुक्यातील गोविळ - गुरववाडी येथे मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. दीपक गंगाराम गुरव असे या प्रौढाचे नाव आहे. आगीमुळे घराचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरववाडीपासून ३०० ते ४०० मीटर दूर दीपक गुरव यांचे घर आहे. तेथे जाण्यासाठी चिंचोळी वाट आहे. सात-आठ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घराबाहेर पडत नव्हते. ते घरात काठीच्या आधारे वावरत. अर्धांगवायूमुळे त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. त्यामुळे ते एकटेच घरात राहत होते. त्यांचे जेवण त्यांचे चुलतभाऊ करीत होते. त्यांचे घर कौलारू असल्याने मोठ्या प्रमाणात लाकूड वापरण्यात आले होते.
मंगळवारी सायंकाळी जेवण आणून दिल्यानंतर चुलत भाऊ अंधार पडण्याच्या अगोदर आपल्या घरी गेला होता. घराच्या हॉलमध्ये दीपक यांचा लाकडी पलंग होता. याच हॉलच्या एका कोपऱ्यात भरलेला सिलिंडर ठेवण्यात आला होता, तर दुसरा स्वयंपाकघरात शेगडीला लावलेला होते. रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्यान हॉलमध्ये ठेवलेल्या सिलिंडरमधून गॅसची गळती सुरू झाली आणि सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, गोविळ गावाबरोबरच आजूबाजूच्या गावातील लोकही घाबरून गेले. या स्फोटात सिलिंडरचेही तुकडे तुकडे झाले. सिलिंडरबरोबर घराच्या छताचा भाग उडून घराचे वासे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी घराला आग लागल्याचे पाहिले आणि गुरववाडी येथील ग्रामस्थांला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर वाडीतील लोक गुरववाडीकडे धावले. ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा करणाºया वायर लाकडी बांबूने काढून टाकल्या. घरामध्ये पाणी नसल्याने तसेच विहीरही सुरक्षित नसल्याने आग आटोक्यात आणायची कशी, हा प्रश्न होता. त्यातच घरामध्ये आणखी एक सिलिंडर असल्याचे लोकांना माहिती होते. त्याचा स्फोट होण्याच्या भीतीने ग्रामस्थ मदतीसाठी पुढे होत नव्हते.
घराला आग लागल्याची माहिती प्रकाश शंकर गुरव यांनी लांजा पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधरी, हेडकॉन्टेबल राजेंद्र कांबळे, श्रीकांत जाधव, नितीन पवार, शांताराम पंदेरे, शेखर नुळके, राजेंद्र वळवी, दीपक कारंडे, चालक चेतन घडशी आदींनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन केले. राजापूर नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा बंब रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आला. मात्र, घराजवळ जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्याचा अपेक्षित उपयोग झाला नाही. बुधवारी सकाळी तलाठी एम्. आर्. जाधव यांनी घराचा पंचनामा केला. या प्रकाराची माहिती मिळताच बुधवारी सकाळी दीपक गुरव यांचे भाऊ गोविळ येथे दाखल झाले. अधिक तपास हेडकॉन्टेबल शांताराम पंदेरे करीत आहेत.
धक्का जोरदार दरवाजाची चौकट तुटली
घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला असल्याचे बुधवारी सकाळी तपासणीत स्पष्ट झाले. किचनमध्ये असलेला सिलिंडर व फ्रीज सुरक्षित राहिले आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की, सिलिंडरचा एक भाग घराजवळ असलेल्या झाडावर आपटून झाडाची फांदी तुटून पडली. सिलिंडरजवळच असलेल्या दरवाजाची चौकटही तुटली आहे.
दीपक गुरव आपल्या लाकडी पलंगावर झोपलेले होते. घराला आग लागल्यानंतर घराच्या पिंजरीचा (छताचा भाग) पेटता भाग त्याच्या अंगावर पडल्याने लाकडी पलंगाला आग लागून त्यामध्ये दीपक यांचा जळून मृत्यू ओढवल्याची माहिती पोलिसांनी दिली. अर्धांगवायूमुळे त्यांना घराबाहेर पडता आले नसावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.