रासायनिक सांडपाण्यामुळे म्हशींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:51+5:302021-06-10T04:21:51+5:30
आवाशी : उघड्यावर सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी प्यायल्याने गुणदे - तलारीवाडी येथील शेतकऱ्याच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, ...
आवाशी : उघड्यावर सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी प्यायल्याने गुणदे - तलारीवाडी येथील शेतकऱ्याच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, सहा म्हशी अत्यवस्थ आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता लोटे - आवाशी औद्योगिक वसाहतीतील हर्डेलिया कंपनीच्या माळरानावर घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, गुणदे - तलारीवाडी येथील शेतकरी यशवंत आखाडे यांच्या नऊ म्हशी नेहमीप्रमाणे आवाशी - गुणदे फाट्यालगत असणाऱ्या हर्डेलिया कंपनीच्या माळरानावर चरण्यासाठी गेल्या होत्या. दुपार उलटली तरीही म्हशी गोठ्याकडे परतल्या नाहीत म्हणून आखाडे, त्यांचे शेजारी रमेश माने यांनी शोधाशोध सुरु केली. ते येथील हर्डेलिया कंपनीच्या आवारात येताच काही म्हशी या माळरानावर तोंडातून फेस येत असल्याच्या अवस्थेत दिसून आल्या. माने यांनी याची माहिती आखाडे यांना तत्काळ दिली. त्याप्रमाणे आखाडे व त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. या परिसरातील पशुवैद्यकीय अधिकारी मोडक यांना या घटनेची माहिती देऊन पाचारण करण्यात आले. त्यांनी लगेचच सर्वच म्हशींवर उपचार सुरु केले. मात्र, नऊपैकी तीन म्हशी उपचाराआधीच मृत झाल्या होत्या तर उर्वरित मृत्यूशी झुंत देत होत्या.
या घटनेची माहिती आवाशी - लोटे परिसरासह पंचक्रोशीत पसरताच अनेक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ एकवटले. यामध्ये खेडचे उपसभापती जीवन आंब्रे, माजी उपसभापती एस. के. आंब्रे, पप्पूशेठ आंब्रे, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, घाणेखुंटचे सरपंच अंकुश काते, आवाशीचे उपसरपंच अमित आंब्रे, लोट्याचे शाखाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य सचिन काते, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष समीर आंब्रे, निशिकांत कदम, आवाशी, गुणदे, शेल्डी, घाणेखुंट, कोतवली, लोटे, पीरलोटे येथील शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, लोटे पोलीस दूरक्षेत्र यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली. यानंतर उशिराने खेडचे नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक निशा जाधव याही घटनास्थळी दाखल झाल्या. घाणेखुंटचे तलाठी डी. एस. ढगे, सीईटीपी इन्चार्ज शिंदे, घरडाचे एच. आर. मॅनेजर अनिल भोसले हेही त्याठिकाणी आले. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
पावसाच्या पाण्याचा फायदा घेत येथील नाल्यातून सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन संबंधित कंपनीचा शोध घ्यावा व शेतकरी आखाडे यांना नुकसानभरपाई देऊन संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
......................
प्रदूषणचे अधिकारी पाच तासांनी
अंदाजे सायंकाळी चार वाजता एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवूनही रात्री आठ वाजेपर्यंत कोणीही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने उपस्थितांमधून संताप व्यक्त केला जात होता.
...................
संशयाची सुई
ज्याठिकाणी घटना घडली ती जागा सध्या येथील घरडा केमिकल कंपनीच्या ताब्यात असून, याठिकाणी येणारे पावसाचे पाणी वा रासायनिक सांडपाणी हे येथील घरडा कंपनी, युएसव्ही व एम्को पेस्टीसाईड यांचे असावे, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संशयाची सुई या तीन कंपन्यांभोवती फिरत असून, यातील दोषी कोण? हे प्रदूषण नियंत्रण मंडळ उघड करणार का? असा प्रश्न केला जात आहे.