जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूने चिंता वाढली, आणखी २२ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:36+5:302021-08-01T04:29:36+5:30
रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आराेग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी ...
रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आराेग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर २५६ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून, दिवसभरात केवळ ११६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा आराेग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शनिवारी दिवसभरात ४, तर मागील १८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील मृतांमध्ये राजापूर तालुक्यातील ७, रत्नागिरीतील ६, चिपळुणातील ४, संगमेश्वरमध्ये २ आणि खेड, गुहागर, लांजातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २०८३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात एकूण ६७,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्णांचा बरे होण्याचा दर ९३.८५ टक्के आहे. ३,६८२ आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५२ बाधित, तर २,३०० अँटिजन चाचण्यांमध्ये १०४ बाधित रुग्ण सापडले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात २ रुग्ण, दापोलीत १७, खेडमध्ये २७, गुहागरात २४, चिपळुणात ५३, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत ९०, लांजात २१ आणि राजापुरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २,०७४ रुग्ण उपचार घेत असून, त्यामध्ये १,६५६ लक्षणे नसलेले रुग्ण, तर ४१८ लक्षणे असलेले रुग्ण आहेत. १९७ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून, ७२ अतिदक्षता विभागात आहेत.
-----------------
अजून मागील मृत्यू किती?
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शुक्रवारी २८ रुग्ण दाखविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी आराेग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये १८ रुग्णांचा मृत्यू मागील दिवसांमध्ये झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मागील दिवसांत आणखी किती जणांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.