दापोलीत दोघांचा मृत्यू

By admin | Published: September 25, 2016 11:58 PM2016-09-25T23:58:53+5:302016-09-25T23:58:53+5:30

गाडीला जलसमाधी : जनजीवन पूर्वपदावर; परशुराम घाटात दरडी काढण्याचे काम सुरू

Death of Dapoli | दापोलीत दोघांचा मृत्यू

दापोलीत दोघांचा मृत्यू

Next

रत्नागिरी : गेले दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने खेड बाजारपेठेची वाताहत झाली असून, नुकसानीचा १२ कोटींचा आकडाही ओलांडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड किनाऱ्यावर भरधाव गाडी चालवणाऱ्या कोरोला गाडीला जलसमाधी मिळाल्याने चालक सागर मालुसरे (वय ४०, वाई, सातारा) यांचा मृत्यू झाला, तर अतिवृष्टीत वाहून गेल्यामुळे दापोली तालुक्यातील करजगाव येथील प्रकाश शंकर बंडबे (५०) यांचा मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी काढण्याचे काम सुरूच असून, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, या पावसाने कोकण रेल्वेलाही वेठीस धरले. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडलेलेच आहे.
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील मुरुड किनाऱ्यावर चालक सागर मालुसरे हा भरधाव गाडी चालवत होता. सागरचे मित्र पाण्यात उतरले होते, तर सागर किनारी भागात भरधाव गाडी चालवत होता. किनाऱ्यावर पडलेल्या खड्ड्यात त्याची गाडी पलटी होऊन गाडीला जलसमाधी मिळाली. गाडीने तीनवेळा पलटी खाल्ल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली. दरम्यान, दापोलीतील करजगाव येथील प्रकाश शंकर बंडबे (५०) यांचा शनिवारी पुलावरील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. बंडबे हे दुचाकीने जात असताना अचानक पुलावरील पाणी वाढले व दुचाकीसह ते वाहून गेले. त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी ११ वाजता बुरोंडी समुद्रात आढळून आला.
पावसाचा जोर न ओसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचले. गुरुवारी मध्यरात्री खेड ते दिवाणखवटी मार्गावर पाणी साचल्याने सुमारे ४ ते ५ तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. खेड तालुक्यातील तीन नद्यांना आलेला पूर आता ओसरला आहे़ २२ व २३ सप्टेंबर रोजी जगबुडी, चोरद आणि नारींंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड जलमय झाले होते़ शनिवारपासूनच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पूर पूर्णपणे ओसरला आहे. खेड शहर आणि तालुक्यातील अनेकांचे तसेच अनेक व्यापाऱ्यांचे या पुरामध्ये नुकसान झाले आहे़ तसेच पूर ओसरल्याने खेड बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार देखील सोमवारपासून पूर्ववत होणार आहेत़
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून अद्यापही एकेरी वाहतूक सुरू आहे. भोस्ते व परशुराम घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळून महामार्ग ठप्प झाला आहे. कशेडी घाटातदेखील काही ठिकाणी दरडीचा भाग खाली आल्याने हा घाट देखील ‘डेंजर झोन’मध्ये आहे. त्यामुळे या घाटमाथ्यावरील दरडी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या धुवाधार पावसाचा फटका खेड तालुक्यातील तळे विभागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खेड-दहिवली हा रस्ता तळे देऊळवाडीपासून किंजळेपर्यंत ठिकठिकाणी वाहून गेल्याने या परिसरातील सुमारे २० गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
पावसामुळे वेळापत्रक बिघडलेल्या कोकण रेल्वेची वाहतूक शुक्रवारी धीम्या गतीने सुरू करण्यात आली. मात्र पावसाचा जोर कायम होता. शनिवारीही रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. आधीच चार तास सेवा ठप्प झाल्याने बिघडलेले रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक शनिवारी व रविवारीही रुळावर आले नाही. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी ४ ते ५ तास उशिराने धावणाऱ्या रेल्वे गाड्या रविवारीही २ ते ३ तास उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Death of Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.