समर्थ कंपनीतील पाचव्या कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:26+5:302021-04-29T04:23:26+5:30
आवाशी : लोटे-परशुराम येथील समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत रविवारी (दि. १८) झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी आनंद जानकर यांचा बुधवारी मृत्यू ...
आवाशी : लोटे-परशुराम येथील समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत रविवारी (दि. १८) झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी आनंद जानकर यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्फोटामध्ये दगावलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील स्फोटात जखमी झालेल्यांवर सांगली येथील सुश्रुत बर्न हॉस्पिटल येथे सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ओंकार साळवी (खेर्डी-चिपळूण) याचा दोनच दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यातीलच आनंद जानकर (कासई-खेड) याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. १८ एप्रिल रोजी झालेल्या स्फोटात सचिन तलवार (बेळगाव), मंगेश जानकर (कासई-खेड), तर विलास कदम (भेलसई-खेड) या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यात जखमी झालेल्या सहा कामगारांपैकी चौघांवर सांगली येथे मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. जागीच मृत्यू झालेले मंगेश जानकर व बुधवारी दगावलेले आनंद जानकर हे दोघे सख्खे भाऊ समर्थ कंपनीत गेल्या काही वर्षांपासून काम करीत होते.
सांगली येथे अधिक उपचारासाठी दाखल केलेल्या चार कामगारांपैकी आता घाणेखुंट येथील विश्वास शिंदे व तलारीवाडी येथील विलास खरवते हे दोघे उपचार घेत आहेत.
माझे सगळेच संपले !...
स्फोटाच्या घडलेल्या घटनेनंतर जागीच गतप्राण झालेल्या तिघांनंतर अनुक्रमे आठ व दहा दिवसांनी अन्य दोघांनीही प्राण गमावल्याने कंपनीचे मालक अमित जोशी कमालीचे तणावाखाली आहेत. पाचव्या मृत्यूबाबत घटनेची खातरजमा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क असता ते ओक्साबोक्शी रडू लागले. ‘माझे सगळेच संपले,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.