मधमाशांच्या हल्ल्यात खेड तालुक्यातील शिवतर येथील माजी सैनिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:00 PM2017-11-04T17:00:18+5:302017-11-04T17:10:42+5:30
खेड : तालुक्यातील शिवतर येथील माजी सैनिक विश्वनाथ गणपत मोरे (६७) यांचा मधमाशांच्या जबरी हल्ल्यात करुण अंत झाला आहे. ही दुर्देवी घटना गुरुवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. खासगी रुग्णालयात त्यांची प्रकृती चिंंताजनक बनल्याने त्यांना उपचारासाठी चिपळूण येथे नेत असताना सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
खेड ,दि. ०४ : तालुक्यातील शिवतर येथील माजी सैनिक विश्वनाथ गणपत मोरे (६७) यांचा मधमाशांच्या जबरी हल्ल्यात करुण अंत झाला आहे. ही दुर्देवी घटना गुरुवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ हे जनावरांना वैरण आणण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या जंगलमय भागात गेले होते. यावेळी त्याठिकाणी असलेल्या मधमाशीच्या पोळ्याला त्यांचा चुकून हात लागला. त्यामुळे चवताळलेल्या मधमाश्यांनी त्यांना चारही बाजूनी घेरत हल्ला चढवला.
यावेळी मधमाशीचे विष त्यांच्या शरीरात भिनले. नातेवाईकांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंंताजनक बनल्याने त्यांना उपचारासाठी चिपळूण येथे नेत असताना सायंकाळी ७च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला आमदार संजय कदम, आरोग्य बांधकाम सभापती अरुण कदम, अजय बिरवटकर उपस्थित होते.