रुग्णालयाच्या वाटेवर जखमी खेळ्याचा मृत्यू
By admin | Published: March 6, 2015 12:23 AM2015-03-06T00:23:13+5:302015-03-06T00:23:33+5:30
आईस फॅक्टरीसमोर दुचाकीने ठोकर दिल्याने अपघात
मंडणगड : शिमगोत्सवासाठी मौजे माहू उतेकरवाडी येथून गावातील पालखीसोबत मंडणगड येथे खेळे म्हणून आलेल्या दोन खेळ्यांचा बुधवारी सायकांळी ७.३० वाजता कार्यक्रम आटोपून घरी जात असताना शहरातील बाणकोट रोड येथील शुभम आईस फॅक्टरीसमोर दुचाकीने ठोकर दिल्याने अपघात झाला. अपघातातील जखमी किशोर बाळकृष्ण सुर्वे यांचा उपचारासाठी पुढे जात असताना वाटेतच मृत्यू झाला.
मौजे माहू येथील शिमगोत्सवासाठी मंडणगड येथे आली होती. पालखी सोबत फिरवण्याचा कार्यक्रम आटपून मयत किशोर सुर्वे आपल्या गावी परत चालले होते. परंतु बाणकोट रोड येथील शुभम आईस्क्रीम फॅक्टरीसमोर मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले.
दोन्ही जखमीवर प्रथम शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुर्वे यांच्या डोक्याला मार बसला असल्याने त्यांना भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी पुढे नेत असताना वाटतेच त्यांचे निधन झाले. अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या अपघातग्रस्ताचे नाव पोलिसांना कळलेले नाही. केवळ तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कळत आहे. यासंदर्भात दिनकर लक्ष्मण हुंबरे (धुत्रोली) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी कथन केलेली माहितीनुसार बुधवारी रात्री मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीने (एमएच - ०४ - बीएच ३६१) या दोघांना ठोकर दिल्याने अपघात झाला. (प्रतिनिधी)