लांजातील मजुराचा मृत्यू विजेच्या धक्क्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:37 AM2021-09-07T04:37:49+5:302021-09-07T04:37:49+5:30
लांजा : घराच्या परिसरात काम करणाऱ्या मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ३.३० वाजेच्या सुमारास लांजा कुक्कुटपालन परिसरात ...
लांजा
: घराच्या परिसरात काम करणाऱ्या मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ३.३० वाजेच्या सुमारास लांजा कुक्कुटपालन परिसरात घडली होती. कंपाऊंड तारेला उतरलेल्या विद्युतप्रवाहाला स्पर्श झाल्यानेच त्याचा मृत्यू ओढावल्याचे घराच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.
प्रदीप सखाराम शिवगण (४५, दाभाेळकरवाडी, कुर्णे, ता. लांजा) असे मृत्यू झालेल्या प्राैढाचे नाव आहे.
प्रदीप शिवगण हा लांजा कुक्कुटपालन आदर्शनगर येथील महेश नागले यांच्या घराच्या परिसरात मजुरीवर काम करण्यासाठी गेला हाेता. परिसरात साफसफाई करताना विहिरीला कठडा नसल्याने त्या ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. रविवारी रिमझिम पडत असलेल्या पावसामुळे विहिरीच्या पंपाला जोडण्यात आलेली वायर शाॅर्ट झाल्याने विद्युतप्रवाह कंपाऊंडच्या तारेला कुठेतरी सुरू होता. या तारेच्या कुंपणाला प्रदीप शिवगणचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार धक्का बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याची खात्री करण्यासाठी लांजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना कंपाऊंडच्या तारेला स्पर्श झाल्याचे लक्षात आले. शाॅक लागताच ताे माेठ्याने ओरडल्याने नागले यांचे कुटुंब धावत बाहेर आहे. त्यावेळी ताे बेशुद्धावस्थेत दिसला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------------------------
कुटुंबाचा आधार हरपला
प्रदीप हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. प्रदीपचे लग्न झालेले असून, त्याला एक छोटी मुलगी आहे. तसेच एक बहीणही आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबांचा उदनिर्वाह चालवत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाचा आधारच हरपला आहे.