अन्नाअभावी बिबट्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 01:48 PM2018-06-23T13:48:32+5:302018-06-23T13:51:13+5:30
संगमेश्वर तालुक्यातील धामापूरतर्फे संगमेश्वर येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील धामापूरतर्फे संगमेश्वर येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भूकबळीने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. जंगलतोडीमुळे मानवाकडून जंगली प्राण्यांचा अधिवास नष्ट केला जात आहे. त्यामुळे बिबट्या मनुष्यवस्तीत येण्याचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील तांबेडी येथे घरात घुसून बिबट्याने हल्ला करीत एकाला गंभीर जखमी केले होते. बिबट्यांचा मानवीवस्तीतील वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या परिसरात फिरणेही आता मुश्किल झाले आहे.
धामापूरतर्फे संगमेश्वर येथील कोटाकुंभा याठिकाणी एका झाडाखाली बुधवारी सकाळी ७.३०च्या सुमारास बिबट्या निपचित पडलेला एका ग्रामस्थाला दिसून आला. बिबट्या दिसताच घाबरलेल्या या ग्रामस्थाने ही बाब अन्य ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती कुंभारखणी खुर्दचे पोलीसपाटील चंद्रकांत महाडिक यांना दिली. त्यांनी याबाबतची माहिती देवरूख वन विभागाला दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, पालीचे वनपाल सुधाकर गुरव, देवरूखचे वनरक्षक सागर गोसावी व उपरे यांनी घटनास्थळी जात बिबट्याची पाहणी केली. यावेळी हा बिबट्या मृत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मृतावस्थेतील हा बिबट्या सुमारे ७ वर्षांचा असल्याचे वन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी जंगल परिसरात गर्दी केली होती.