चिपळूण बाजारपेठेत वीकेंड लॉकडाऊननंतर मरणाची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:28+5:302021-04-13T04:30:28+5:30
फोटो - चिपळूण बाजारपेठेतील जुना बसस्थानक परिसरात खरेदीसाठी सोमवारी प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : संदीप बांद्रे) लाेकमत न्यूज ...
फोटो - चिपळूण बाजारपेठेतील जुना बसस्थानक परिसरात खरेदीसाठी सोमवारी प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दोन दिवसांचे वीकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी येथील बाजारपेठ पूर्णतः बहरली होती. मोजकीच दुकाने बंद होती. त्यातच मंगळवारी होणाऱ्या पाडव्याच्या पार्श्वभूमीवर व भविष्यात लॉकडाऊन लागण्याच्या भीतीपोटी बाजारपेठेत खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती.
सोमवारपासून सुरु झालेल्या मिनी लॉकडाऊनला येथील जनतेने प्रतिसाद दिला असला तरी त्याला व्यापाऱ्यांचा विरोध ठाम आहे. आजही सर्व दुकाने उघडण्याच्या भूमिकेवर येथील व्यापारी ठाम आहेत. सध्याची व्यापाऱ्यांची आर्थिक बाजू बघता शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे सध्याच्या अटी शिथिल करा, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.
दुकाने उघडण्याचा इशारा तालुका व्यापारी महासंघाने काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना दिला असून, याबाबत आमदार शेखर निकम यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आहे. प्रशासनाने हे निवेदन शासनाकडे पाठवले आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय होणे शक्य नसून तो शासनच घेऊ शकते, असे प्रशासनाचे मत आहे. तुम्ही काहीही निर्णय घ्या, आम्ही दिलेल्या इशाऱ्यानुसार बाजारपेठ उघडणार, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. याचा प्रत्यय सोमवारी आला. दर सोमवारी येथील बाजारपेठ बंद ठेवली जाते. मात्र, यावेळी उलट परिस्थिती होती.
कोट
व्यापारी महासंघाने दिलेले निवेदन आम्ही शासन स्तरावर पाठवले आहे. त्यावर शासन योग्य तो निर्णय घेईल. मात्र, व्यापाऱ्यांनी आतापर्यंत प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे. तीच सहकार्याची भूमिका त्यांनी कायम ठेवावी. नियम मोडल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, चिपळूण.