भोपण खाडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By admin | Published: July 15, 2014 11:40 PM2014-07-15T23:40:13+5:302014-07-15T23:44:05+5:30
दापोली तालुका : निधी मंजूर होऊनही पंधरा वर्षे खाडीपुलाकडे दुर्लक्ष...
शिवाजी गोरे - दापोली
दापोली तालुक्यातील दाभीळ भोपण खाडीवर पूल व्हावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. १९६६मध्ये दाभीळ येथे मॉडर्न हायस्कूलची स्थापना झाली व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळाला. परंतु शिक्षण घेण्यासाठी होडक्याचा आधार घ्यावा लागला. गेली ४० वर्षे आपली शैक्षणिक भूक भागवण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दाभीळ येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये आपली शैक्षणिक भूक भागवण्यासाठी भोपण-पंदेरी येथील सुमारे ६० विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून त्यांना खाडी पार करावी लागत आहे. आपला पाल्य घराबाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत पालकांना काळजी असते. पावसाचा जोर वाढल्यास होडकाचालकसुद्धा त्यांना धोक्याचा इशारा देऊन परत पाठवतो.
काही वेळा अतिवृष्टीचा इशारा दिल्यास सलग आठ दिवस शाळेला दांडी मारावी लागते. दाभीळ पंचक्रोशीत एकमेव मॉडर्न हायस्कूल आहे. या हायस्कूलमुळे शिक्षणाची सोय झाली. परंतु गेली ४० वर्षे खाडीपुलाची मागणी करुनही ग्रामस्थांच्या मागणीला यश आले नाही.
युतीच्या सत्ता काळात तत्कालीनमंत्री रामदास कदम यांनी या खाडी पुलाला मंजुरी दिली होती. १९ जून १९९९ रोजी या पुलाची टेंडर नोटीस प्रसिद्ध झाली होती. ७ कोटी रुपये या खाडीपुलासाठी मंजूर झाले होते. परंतु त्यानंतर युतीचे सरकार गेले व आघाडी सरकार आले. गेली २५ वर्षे या खाडीपुलाचा भोपण ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा सुरु आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दाभीळ भोपण खाडीपूल मार्गी लागल्यास दळणवळणाची सोय होइल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. मात्र, हेच सरकार दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत.
धोकादायक खाडीत यापूर्वी दोनवेळा दुर्घटना घडून काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दाभीळला पाठवण्याऐवजी काही पालक मुलींचे शिक्षणच बंद करीत आहेत. धोकादायक खाडी पार करुन शाळेत जाण्यापेक्षा शाळा सोडा, असा तगादा काही पालक विद्यार्थ्यांकडे लावत आहेत.
दाभोळ मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक दळवी, अकबर शमशुद्दीन, अजित तांबे, एस. एन. होनवले, एस. एम. मुस्सा, ए. एस. दळवी, एफ. आय. काववेकर, कैलास गांधी, बी. एस. शिरसाट आदी शिक्षक मुलांना प्रोत्साहीत करुन शाळेत येण्यास सांगतात.