डेथ ऑडिट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:38+5:302021-06-25T04:22:38+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात युवकांची संख्या जास्त आहे. याची कारणे शोधण्यासाठी डेथ ऑडिट ...
रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात युवकांची संख्या जास्त आहे. याची कारणे शोधण्यासाठी डेथ ऑडिट करण्याचा निर्णय जिल्हा कृती दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यात मृत्यूमागील नेमकी कारणे, लक्षणे तसेच सहव्याधी, आदींचा अभ्यास तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत.
दोन गावांचा समावेश
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाच गावांचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये करण्यात आला आहे. डेल्टा प्लस या व्हेरिंएटच्या शक्यतेमुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात तालुक्यातील धामणी, कसबा, नावडी, माभळे, कोंडगाव याचबरोबर अन्य दोन गावांचा समावेश होणार आहे.
मातीचा भराव
खेड : भरणा नाका ते खोपी फाटा दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट ते परशुराम घाटदरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, केवळ बौद्धवाडी, शिक्षक कॉलनी आणि ब्राह्मणवाडीकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावर मातीचा भराव आला आहे. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे.
खाडीपुलाची मागणी
दापोली : रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत खाडीपुलाची दुरुस्ती पूर्ण होऊनही अद्याप हा पूल बंदच ठेवण्यात आला आहे. सध्या जेटीद्वारे या पुलावरून वाहतूक सुरू असून, पावसाळा अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आंबेत खाडीपूल त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
योगगुरूंचा सत्कार
राजापूर : शहर भाजपच्यावतीने राजापूर हायस्कूलच्या योग शिक्षिका अरुणा दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगगुरू दिवटे यांचा भाजपच्यावतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहर भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेला प्रतिसाद
चिपळूण : लायन्स क्लब चिपळूण यांच्यावतीने ज्येष्ठांसाठी पर्यावरणासाठी मी केलेले कार्य या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत कुलकर्णी आणि सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत मांडवकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
रोपांची विक्री
खेड : येथील एस.टी. स्टॅण्डसमोर वाणीपेठ, बाजारपेठ, नगरपालिका पाठीमागचे मैदान येथे मिरची, वांगी, माठाच्या पालेभाजीच्या रोपांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्रामीण भागातील महिला गावठी भाज्यांची रोपे आपापल्या परिसरात करून विक्रीला आणत आहेत. सध्या या रोपांना मागणी वाढली आहे.
तोतापुरी आंब्याला मागणी
रत्नागिरी : शहरात सध्या तोतापुरी, नीलम आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यावेळी अवेळी पडलेल्या पावसामुळे हापूसवर संक्रांत आल्याने नागरिकांना म्हणावा तेवढा आस्वाद घेता आला नाही. मात्र, सध्या सर्वसामान्य ग्राहक तोतापुरी आणि नीलम हापूस आंब्याकडे वळलेले दिसत आहेत.
स्वच्छतागृहे अस्वच्छ
दापोली : दाभोळ धक्क्यावर बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय झाली आहे. या ठिकाणची स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी दाभोळ ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. मात्र, येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.
मास्क वाटप
सावर्डे : जिवाजी बाबूराव राणे स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोविड सेंटर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना आरोग्य साहित्य देऊन गेल्या काही महिन्यांपासून मदत करण्यात येत आहे. चिपळूण नगरपरिषदेत या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्मृती राणे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, बांधकाम सभापती मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत मास्क वाटप करण्यात आले.