ट्रॅक्टर दरीत कोसळून महिलेचा मृत्यू
By Admin | Published: March 26, 2017 10:40 PM2017-03-26T22:40:40+5:302017-03-26T22:40:40+5:30
१४ जण जखमी; कासे पेढांबे येथील घटना; मोठा अनर्थ टळला
असुर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कासे पेढांबे बौद्धवाडीजवळ रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्ता करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. प्रेमा आकाश राठोड (वय २५, विजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हडकणी (चिपळूण) येथे राहणारे लमाणी समाजातील मजूर आपल्या वस्तीवरून संगमेश्वर तालुक्यातील कासे पेढांबे येथे रस्त्याच्या कामासाठी निघाले होते. मुकादम राठोड यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून सुमारे २५जण सावर्डे मार्गे कासेच्या दिशेने नायशीतून पुढे जात असताना पेढांबे बौद्धवाडीजवळ हा अपघात झाला. ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने तो ट्रॉलीसह दरीत कोसळला. अपघातामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉलीने दोन पलटी घेतल्यामुळे ट्रॉलीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी दुखापत झाली. यामध्ये सुरेखा कृष्णा राठोड (१८), श्रीदेवी पांडुरंग चव्हाण (२०), पांडुरंग भिलू चव्हाण (५५), किरण खेमू जाधव (२१), योगेश खेमू जाधव (३२), सुनील बाबू राठोड (१८), पुतळाबाई कृष्णा राठोड (४५), अशोक नरसू राठोड (३५), रुकमाबाई काशिनाथ चव्हाण (४५), श्रीकांत गंगाराम राठोड (४५), पारुबाई एकनाथ जाधव (३०), रमेश चंद्रकांत खेतरे (२४), रोहित मोहन राठोड (३), संतोष राठोड (२५) (विजापूर कर्नाटक) यांचा समावेश आहे.
या अपघातात प्रेमा आकाश राठोड ही महिला अत्यवस्थ होती. तिला उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. अन्य अपघातग्रस्तांवर डेरवण येथे उपचार सुरू आहेत.
या अपघातग्रस्तांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॉलीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती समजताच संगमेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत माखजन पोलिस चौकीतील हेड कॉन्स्टेबल दीपक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)