विषारी औषध प्राशन केलेल्या मारळ गावातील तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:23+5:302021-09-06T04:36:23+5:30
देवरूख : नाेकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन केलेल्या मारळ (ता. संगमेश्वर) येथील तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी दुर्दैवी मृत्यू ...
देवरूख : नाेकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन केलेल्या मारळ (ता. संगमेश्वर) येथील तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. रोहित शरद पवार (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन केल्याचे रोहित याने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. रोहित पवार याचे मूळ गाव मारळ असून, तो कामानिमित्त रत्नागिरी येथे वास्तव्याला होता. दोन दिवसांपूर्वी ताे आपल्या घरी आला होता. यावेळी त्याच्या पोटात दुखू लागल्याने वडिलांनी त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर आपण उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याचे रोहितने वैद्यकीय सूत्रांना सांगितले. यामुळे त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आंगवलीचे बीट अंमलदार संदेश जाधव यांनी रविवारी दिली आहे. रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात रोहित याच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मारळ येथील स्मशानभूमीत रविवारी रोहित याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.