देवरुखातील आठवडा बाजारात व्यापाऱ्यांकडून फसवणूक, व्यापाऱ्याला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:02 AM2019-03-04T11:02:59+5:302019-03-04T11:05:13+5:30
देवरूख : शहरात आठवडा बाजारात विक्री करीता येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून गोरगरिब ग्राहकांची वजनात फसवणुक केली जाते हा प्रकार रविवारी पुन्हा एकदा ...
देवरूख : शहरात आठवडा बाजारात विक्री करीता येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून गोरगरिब ग्राहकांची वजनात फसवणुक केली जाते हा प्रकार रविवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. प्रत्येक वस्तुच्या वजनात तब्बल अर्धा किलोची तफावत आढळून आली आहे. ही बाब स्थानिक व्यापारी, नागरिकांच्या लक्षात येताच फसवणुक करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. या प्रकाराबाबत कोठेही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे पुढे आले आहे.
देवरूख खालची आळी परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरतो. घाटमाथ्यावरून भाजीपाला, फळ विक्रेते, कपडे, मसालेवाले, शीतपेयवाले आदी विविध वस्तुंचे व्यापारी दाखल होतात.
या आठवडा बाजारात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. या व्यापाऱ्यांकडून वजनकाट्याद्वारे ग्राहकांची फसवणुक करण्याचा प्रकार यापुर्वी अनेक वेळा घडला होता. यावेळी स्थानिक व्यापारी, नागरिकांनी आवाज उठविल्यामुळे व नगरपंचायतीच्या पुढाकाराने या व्यापाऱ्यांवर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात आले होते. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकाराला काही अंशी आळा बसला होता.
फसवणुकीचा हा प्रकार थांबलेला असताना रविवारी पुन्हा एकदा आठवडा बाजारातील मसाले विक्रेत्याने महिलांंची वजन काट्याद्वारे फसवणुक केली. महिलांच्या गर्दीचा फायदा या व्यापाऱ्याने घेतला. धने व खोबरे खरेदीत तब्बल अर्धा किलोची घट असल्याचे उघड झाले.
यानंतर त्या ग्राहकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडे सदर वस्तुंचे वजन केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. स्थानिक नागरिकांसह व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, हनिफ हरचिरकर, राजन शेट्ये, विकास जागुष्टे, उदय बेर्डे आदींनी सदर व्यापाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.
ग्राहकांच्या फसणुकीचे प्रकार थांबणे गरजेचे आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीने कटाक्षाने लक्ष द्यावे. जे व्यापारी ग्राहकांची फसवणुक करतील अशा व्यापाऱ्यांना बाजारात पुन्हा थारा देता कामा नये तसेच फसवणुक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी ग्राहक व नागरिकांमधून होत आहे.
याबाबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत म्हणाले की, फसणुकीचा प्रकार हा चुकीचा आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीने लक्ष द्यावे. तसेच वजन माप तपासणी मोहिम आठवडा बाजारात राबविणे गरजेचे आहे तसेच ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे नमूद केले.