सौंदळ रेल्वे स्थानकाबाबत निर्णय ?

By admin | Published: December 31, 2014 10:03 PM2014-12-31T22:03:34+5:302015-01-01T00:16:54+5:30

रेल्वेमंत्र्यांचा दौरा : प्रभू यांच्या दौऱ्यात कोल्हापूर-राजापूर रेल्वे मार्गाबाबत निर्णय अपेक्षित

Decision about Saundal railway station? | सौंदळ रेल्वे स्थानकाबाबत निर्णय ?

सौंदळ रेल्वे स्थानकाबाबत निर्णय ?

Next

राजापूर : रेल्वेसारख्या महत्वपूर्ण खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरेश प्रभू हे प्रथमच कोकणच्या दौऱ्यावर येत असल्याने कोकणवासियांमध्ये उत्साह संचारला आहे. मागील अनेक वर्षे सातत्याने अन्याय झालेल्या कोकण रेल्वेच्या सर्व समस्यांसह प्रलंबित सौंदळ स्थानक व नियोजित राजापूर - कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री कोणते भाष्य करतात, याला महत्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात उद्योग व पर्यावरण, खत, रसायन, ऊर्जा आदी मंत्रीपदांसह महत्त्वाकांक्षी नद्या जोड प्रकल्पाचे अध्यक्षपद भूषविणारे प्रभू यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेसारख्या महत्वपूर्ण खात्याची जबाबदारी सुपूर्द केली. ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मधु दंडवते यांच्यानंतर महाराष्ट्राचा आणि तेसुद्धा कोकणाला रेल्वेमंत्रीपद प्रथमच लाभले आहे. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत.
रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रभू प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून, त्या दरम्यान ते राजापूरलाही भेट देणार आहेत. दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान प्रभूंचा सत्कार होणार आहे.
मूळ कोकणातील असणारे प्रभू हे राजापूरसह रत्नागिरीत येत असल्याने येथील नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. प्रभूंकडे रेल्वेबाबतच्या समस्या सोडवल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सौंदळ रेल्वे स्थानकाची सातत्याने होणारी मागणी व काही वर्षांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात सुतोवाच करण्यात आलेल्या पण अजूनही करण्याबाबत उदासीन असलेल्या नियोजित कोल्हापूर - राजापूर रेल्वे मार्गाचा प्रश्नही या निमित्ताने मार्गी लागणार आहे. याबाबत प्रभू यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राजापूर रोड रेल्वे स्थानकात मुंबई - गोवावगळता परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याची एकही गाडी थांबत नाही. याबाबतदेखील प्रभू कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे. तसेच कोकणासाठी आणखी एखादी लोकल गाडी सुरु व्हावी, अशी अपेक्षा आहे. रेल्वे स्थानके शहरापासून खूप लांब असल्याने रेल्वे स्थानक ते संबंधित गावे यामध्ये दळणवळणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

रेल्वे स्थानकावरील सुविधांचे काय
रेल्वे स्थानकावरील विविध सुविधांबाबत अनेकवेळा मागणी करुनही लक्ष दिले जात नाही. या भागाला सोयीच्या असणाऱ्या सौंदळ रेल्वे स्थानकासाठी कित्येक वर्षांची मागणी मान्य होणार का? व त्यासाठी कोकणचे म्हणून प्रभू कोणती भूमिका निभावणार हेही यावेळी स्पष्ट होणार आहे.


सुरेश प्रभू यांनी कोकणातील रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत. कोकण रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सोयीसुविधांचा लाभ येथील भूमिपुत्राला मिळावा, यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. त्याबाबत दौऱ्यात प्रभू कोणती घोषणा करतात हे महत्त्वाचे.

Web Title: Decision about Saundal railway station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.