गणेशाेत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:37 AM2021-09-07T04:37:36+5:302021-09-07T04:37:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी, शर्ती व नियमांचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी, शर्ती व नियमांचे काटेकोर पालन करत गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
यंदा उत्सवाचे ९६ वे वर्ष साजरे करणाऱ्या या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत राजापुरातील दोन आपद्ग्रस्त युवकांना आर्थिक मदत देऊ केली आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरात संपूर्ण दुकान उद्ध्वस्त झालेल्या कोंढेतड येथील जगदीश गणपत पेणकर या युवकाला ५ हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष विजय कुबडे, कार्यवाह आ. के. मराठे, खजिनदार रमेश गुणे व सदस्य सुभाष पवार उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच संपूर्ण दुकान अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या नरेंद्र पावसकर या उद्योजक युवकालाही मंडळाने तातडीची मदत म्हणून ५ हजारांचा धनादेश दिला होता. समाजभान जपणाऱ्या राजापुरातील या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कामाचे काैतुक करण्यात येत आहे.