कोकणच्या विविधांगी विकासासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:03+5:302021-07-05T04:20:03+5:30
रत्नागिरी : कोकणच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या आंबा, काजू, मत्स्यशेती आणि पर्यटन व्यवसायांच्या विविधांगी विकासासाठी संयुक्त राष्ट्र विकास ...
रत्नागिरी : कोकणच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या आंबा, काजू, मत्स्यशेती आणि पर्यटन व्यवसायांच्या विविधांगी विकासासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएसडीपी) सहकार्याने पायलट प्रोजेक्ट राबवून कोकण विकासाला बुस्टर देण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. माजी केद्रींय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत प्रभू यांनी या प्रकल्पाचा आराखडा सादर केला आहे. कोकणातील आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन या व्यवसायांवर अर्थकारण अवलंबून आहे. या व्यवसायांमधून प्रचंड रोजगार आणि अर्थ उभारण्याची क्षमता असताना पायाभूत सुविधांच्या अभावी या व्यवसायांना उमेद आणि उभारी मिळाली नाही. केरळ किंवा गोवा या राज्यांनी याच क्षेत्रात प्रचंड अर्थक्षमता उभी केली आहे. कोकणाला निसर्गत: देणगी प्राप्त असल्याने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने कोकण विकासाचा हा बुस्टर आराखडा सादर केला आहे.
लखनौ येथील भारतीय व्यस्थापकीय संस्था आणि राष्ट्रीय उपयोजिता आर्थिक संशोधन परिषदेने यासाठी आराखडा तयार केला आहे. यामध्ये बिहार, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या चार राज्यांतील प्रत्येकी एका जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाला आता चालना मिळणार आहे.