रत्नागिरी जिल्ह्याच्या लाॅकडाऊनबाबतचा निर्णय आणखी दोन दिवस लांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:28+5:302021-05-14T04:31:28+5:30
रत्नागिरी : सध्या १५ मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. तो पुढे किती दिवसांपर्यंत वाढवायचा, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील; ...
रत्नागिरी : सध्या १५ मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. तो पुढे किती दिवसांपर्यंत वाढवायचा, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील; पण त्याचबरोबर जिल्ह्यात कोविडची परिस्थिती काय आहे, हे बघून निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या जिल्ह्याला दिलेले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा झाली आहे. काही विषयासंदर्भात आढावा घेऊन काही निर्बंध अधिक कडक करायचे किंवा त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे येत्या दोन-तीन दिवसांत ठरवून त्यानुसार तो निर्णय जाहीर करू, असे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार की नाही, हा निर्णय आणखी काही दिवस पुढे गेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड साथीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण, तसेच आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य आस्थापना, तसेच ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ आदी सर्व विषयांसंंदर्भात आढावा बैठका घेण्यासाठी पालकमंत्री ॲड. अनिल परब गुरुवारी रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
दोनच दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी रत्नागिरीत लाॅकडाऊन करायचे किंवा नाही, याचा निर्णय गुरुवारी पालकमंत्री घेतील, असे सांगितले होते. तसेच वेळ पडल्यास कडक लाॅकडाऊन करण्यात येईल, असेही सूतोवाच केले होते. त्यामुळेे पालकमंत्री गुरुवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करणार, असे वाटत होते. मात्र, ॲड. परब यांनी हा निर्णय आणखी दोन-तीन दिवसांनंतर घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १५ मेपर्यंत सध्या लाॅकडाऊन सुरू आहे हे लाॅकडाऊन पुढे किती दिवसांपर्यंत वाढवायचे, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात असलेली कोरोनाची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी कोणते निर्बंध लावायचे, कोणते अधिक कडक करायचे याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यायचा आहे. त्यादृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. त्यामुळे लाॅकडाऊनचा निर्णय पुन्हा जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.