रत्नागिरी : पडवे येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:42 PM2018-12-26T16:42:39+5:302018-12-26T16:45:14+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही.
आबलोली : संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही.
मोहीमेपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी पडवे उर्दू शाळेत पालकासाठी संवाद सभा घेऊन मार्गदर्शन केले होते. शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला होता. तरी पडवे येथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली आयोजित लसीकरण सत्रास प्रतिसाद दिला नाही.
व्हॉटस्अॅप व फेसबुकवरील चुकीचे संदेश, अफवांमुळे ग्रामस्थांच्या मनात गैरसमज, साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी लसीकरणास प्रतिसाद दिला नाही. परिणामी लसीकरण उद्दीष्टपूर्ती होण्यात अडचण येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली अंतर्गत आतापर्यंत ८६ ते ८७ टक्के लाभार्थीना लस टोचण्यात आली आहे. पडवे, तवसाळ - काताळे येथील उर्दू शाळेतील लाभार्थी पूर्ण झाल्यास १०० टक्के काम पूर्ण होईल. या गावात परत एकदा पालक संवाद सभा घेऊन पालकांच्या शंका निरसन करण्यात येईल व परत एकदा लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
गोवर - रुबेला या जीवघेण्या आजारापासून रक्षण करणारी आहे. देशाबाहेर कामासाठी नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना ही लस घेतलेल्यांचे प्रमाणपत्र कामी येणार आहे म्हणून लसीकरण सत्रात अडथळा निर्माण न करता नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. जी. पी. जांगीड,
वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवली.