पुढच्या पिढीची अधोगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:01+5:302021-08-02T04:12:01+5:30
वाजपेयी सरकारच्या वेळी शिक्षण अहवाल ज्या भांडवलदारांच्या कमिटीने तयार केला होता, त्यात त्यांनी देशात शिक्षण सर्वांना घेण्याची गरज ...
वाजपेयी सरकारच्या वेळी शिक्षण अहवाल ज्या भांडवलदारांच्या कमिटीने तयार केला होता, त्यात त्यांनी देशात शिक्षण सर्वांना घेण्याची गरज नाही, असे म्हटले होते तेच आता घडते आहे. सरकारने सर्वांनाच ऑनलाईन शिक्षण सुरू केले. इथेच शासनाने मेख मारली. ज्यांची परिस्थिती आहे, ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत, तीच मुले शिक्षण घेऊ शकत आहेत. खेड्यात राहणारी, गरीब व आदिवासी मुले शिक्षणापासून आपोआप वंचित झाली.
या लॉकडाऊनमुळे फक्त एवढेच झाले नाही. मुलांचे खच्चीकरण झाले, ती मानसिक रोगी होऊ लागली. त्यांच्यावर फार मोठा मानसिक आघात झालाय. शाळा बंद, बाहेर फिरणे बंद, मित्रांचा सहवास नाही, शारीरिक हालचाल बंद, मेंदूला काम नाही, शरीराला काम नाही, याचा मुलांवर काय परिणाम होईल, याचा कोणीच विचार केला नाही, सरकारलाही बंदचा मुलांवर परिणाम होतोय ते महत्त्वाचे वाटले नाही. देशाची भावी पिढी मानसिकरित्या शारीरिकरित्या संपवली जातेय. ज्या पिढीच्या हातात देशाचे भवितव्य आहे तिची आजची परिस्थिती बघा. कधीच न अनुभवलेले
लॉकडाऊनचे वातावरण मुलांना अस्वस्थ करीत आहे. त्यांच्यात नकारात्मकता वाढत आहे. कसली तरी अनामिक भीती त्यांच्या मनाला ग्रासते आहे. त्यांना परीक्षेसंदर्भातील भीती आहे, परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत, त्याबद्दलची चिंता आहे, ऑनलाईन परीक्षेची चिंता आहे. ही सर्व भीती कशी व्यक्त करावी, तेच त्यांना कळत नाहीये. ज्या वयात मैदानी खेळ खेळले पाहिजेत, मित्रांबरोबर गप्पा मारल्या पाहिजेत, सुख - दुःखाची देवाण - घेवाण केली पाहिजे, ते सर्व थांबले आहे. ज्या मुलांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्या घरातले वातावरण निराशेने भरलेले आहे, कुटुंब कसे चालवायचे, या चिंतेने घरात चिडचिड वाढली आहे. आपापसातला राग पालक पाल्यावर काढीत आहेत, ही सर्व परिस्थिती मुलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण करीत आहे. घरातले वातावरण सतत तणावाचे राहिल्यास मुलांमध्ये
पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची लक्षणे दिसू लागतात. आपला एकटेपणा घालविण्यासाठी मुले हिंसक ऑनलाईन गेम खेळणे, पॉर्नोग्राफी साईट पाहणे याकडे वळत आहेत.
शिक्षण घेणे हा सर्वांचा अधिकार आहे. यासाठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, पुन्हा पहिल्यासारखी शिक्षण पद्धती सुरू झाली पाहिजे. परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि पास होणारी मुलेच वरच्या वर्गात गेली पाहिजेत. भारताची भावी पिढी तंदुरुस्त कशी राहील, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. उगाच नसलेला आजार आहे आहे म्हणत भुई बडविण्यात काय हशील आहे?
डॉ. मीनल कुष्टे, लांजा