जिल्ह्यात रुग्णसंख्येत होतेय घट; २२७ नव्या रुग्णांची भर, एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:51+5:302021-07-07T04:38:51+5:30
रत्नागिरी : जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासा मिळू लागला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार गेल्या २४ ...
रत्नागिरी : जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासा मिळू लागला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत सोमवारी बाधित झालेल्या १७८ रुग्णांमध्ये मागील ४९ रुग्णांची नोंद होऊन २२७ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत रुग्णसंख्या ६४ हजार २०९ इतकी झाली आहे, तर बरे होणाऱ्यांची संख्या ५६,४८१ इतकी आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आता गावांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची ओढाताण होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
सोमवारी नव्या २२७ रुग्णांची नोंद झाली. यात २४ तासांतील १७८ आणि मागील ४९ अशा एकूण २२७ रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या दिवसभरात मंडणगडात एकही रुग्ण बाधित आढळला नाही. दापोली ७, खेड १२, चिपळूण ३८, गुहागर ९, संगमेश्वर २३, रत्नागिरी ५७, लांजा ११ आणि राजापूर तालुक्यात २१ रुग्ण आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६४ हजार २०९ इतकी झाली आहे, तर कोरोनाने आतापर्यंत १८१७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली असून सोमवारी ४३० रुग्ण बरे झाल्याने घरी परतले. आतापर्यंत ५६,४८१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सध्या ५४४८ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी विविध संस्थात्मक विलगीकरणात २९८७ जण उपचार घेत आहेत. २४६१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला हायसे वाटू लागले आहे.