सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली, प्रतीक्षा ग्राहकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:26 PM2019-08-27T13:26:20+5:302019-08-27T13:29:09+5:30
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून मखर, सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्य खरेदी सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून मखर, सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्य खरेदी सुरू करण्यात आली आहे.
थर्माकोल वापरावरील बंदीमुळे तयार कापडी मखराचे दालन ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. विविध आकारातील आसने, इको फ्रेंडली मखरे विक्रीस उपलब्ध आहेत. आकर्षक पडदे, सजावटीसाठी झालर, तोरणे आदी विविध प्रकार उपलब्ध आहेत. गणपतीसाठी शेला, फेटा, पूजेसाठी सोवळेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
रेडीमेड मखरापासून त्याच्या भोवती सुशोभिकरणासाठी लावण्यात येणाऱ्या पानाफुलांच्या माळा, कमानी, बुके, विद्युत माळा उपलब्ध आहेत. कागदी, क्रेप, मण्यांच्या, काचेच्या नळ्या किंवा शंख शिंपल्यांचा, कुंदन, मोती, खडे वापरून तयार केलेल्या माळा बाजारात विक्रीला आल्या आहेत. गणपतीच्या गळ्यातील कंठी, हार उपलब्ध आहेत.
स्वदेशी तसेच चायनामेड विजेच्या माळांना मागणी होत आहे. लवंगी, स्ट्रॉबेरी, अॅपल आदी आकारासह संगीत विद्युत माळा, याशिवाय फिरती छत्री, फिरते चक्र उपलब्ध आहेत. एलईडी व एलजीपीचे रंगीत दिवे बाजारात उपलब्ध आहेत.
मूर्तीच्या गळ्यात ताज्या फुलांचे हार घातले जातातच, परंतु कृत्रिम हारही घालण्यात येतात. पारंपरिक मण्यांच्या हाराबरोबर कागदी फुलांचे हार उपलब्ध आहेत. शिवाय पर्यावरणपूरक सुगंधी हार बाजारात विक्रीस आले आहेत. गणपतीसाठी किरीट, बाजूबंद, जास्वंदीची फुले यांना मागणी होत आहे. परराज्यातील ढोलकी व्यावसायिक सालाबादप्रमाणे प्रत्येक शहरात दाखल झाले आहेत. सोन्या, चांदीच्या दागिन्यांच्या किमती वधारल्याने बाप्पाच्या दागिन्यांनाही महागाईची झळ बसत आहे.