पावसाचा जोर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:12+5:302021-06-11T04:22:12+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी असलेला पावसाचा जोर गुरुवारी दापोली तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कमी झाला. काही तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाची ...
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी असलेला पावसाचा जोर गुरुवारी दापोली तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कमी झाला. काही तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाची पाठ होती, तर काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. बुधवारी पावसाने जिल्ह्यात जोरदार सुरुवात केली. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २१.३० मिलिमीटर तर एकूण १९१.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती कुठेही घडलेली नाही.
गुरुवारी दापोली तालुक्यात मात्र बुधवार रात्रीपासून जोरदार पाऊस होता. संगमेश्वर, रत्नागिरी, मंडणगड, गुहागर तालुक्यात तुरळक पाऊस पडला. खेड तालुक्यात अधूनमधून सरी पडत होत्या. मात्र, राजापूर, चिपळुणात पावसाची पाठ होती. या तालुक्यांमध्ये नागरिकांना सूर्यदर्शन झाले. रत्नागिरीत दिवसभर पावसाचे वातावरण होते. मात्र, केवळ मळभी वातावरण दिवसभर होते. अधूनमधून ढगांचा गडगडाट होत होता; मात्र पावसाची विश्रांती होती. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीत रात्री पावसाचा जोर कायम असतो.
जिल्ह्यात ११ आणि १२ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे खेड, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर या पूरप्रवण शहरांना तसेच ३१ गावांना आणि ४५ दरडग्रस्त गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.