कामथे रुग्णालयात आज सेमी आयसीयू कोविड वॉर्डचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:22+5:302021-05-29T04:24:22+5:30
चिपळूण : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड अपुरे पडत आहेत. कोविड सेंटरही ...
चिपळूण : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड अपुरे पडत आहेत. कोविड सेंटरही सध्या फुल्ल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सागर कर्तव्य फाऊंडेशनतर्फे कामथे कोविड रुग्णालयातील आनंदी जोशी हॉलमध्ये सेमी आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या आरोग्य सेवेचे लोकार्पण २९ रोजी सकाळी ११ वाजता कामथे रुग्णालयातील परिचारिकांच्या व चिपळुणातील ज्येष्ठ डॉक्टर प्रकाश पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि बेडची अपुरी संख्या पाहता माजी आमदार नानासाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ सागर कर्तव्य फाऊंडेशनकडून काविळतळी येथील सागर सहजीवन संकुलमध्ये ४० बेडचे कोविड केअर सेंटर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनुसार उभारण्यात येणार होते. मात्र, तेथील स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर कामथे येथील आनंदी जोशी हॉलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योजक राजू जोशी यांच्या प्रयत्नातून आनंदी जोशी हॉलमध्ये आयसीयू वॉर्ड उभारण्यात आला आहेत. हा वॉर्ड वातानुकूलित करण्यात आला आहे.
या आयसीयू वॉर्डच्या निमित्ताने आनंदी जोशी हॉलचे रुपडे बदलले आहे. रंगरंगोटी करून येथील रुग्णांना आनंददायी वातावरण लाभेल, यासाठी काही पॉझिटिव्ह चित्रे, सुमधुर संगीत देण्याची व्यवस्था वॉर्डमध्ये करण्यात आली आहे. याठिकाणी दोन सुसज्ज शौचालये व दोन बाथरूमही उभारण्यात आले आहेत. या आरोग्य सुविधेचे लोकार्पण होत असून, यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.