लांजातील तीन पतसंस्थांना ‘दीपस्तंभ पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:15+5:302021-07-30T04:33:15+5:30
लांजा : शहरातील तीन पतसंस्थांना सलग तिसऱ्या वर्षी सहकारातील मानाचा ...
लांजा : शहरातील तीन पतसंस्थांना सलग तिसऱ्या वर्षी सहकारातील मानाचा सन २०१९ - २०२०चा राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ पुरस्कार’ नुकताच शिर्डी येथे प्रदान करण्यात आला.
सहकारी पतसंस्था आपल्या स्वबळावर कामकाज चालवतात. त्यांना शासनाचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. त्याचबरोबर बदलते आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा पतसंस्थांच्या कामकाजावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या साऱ्या घडामोडींसह कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी समतोल साधून शहरातील लांजा नागरी सहकारी पतसंस्था, कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आणि जनता नागरी सहकारी पतसंस्था या तिन्ही पतसंस्थांनी सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ पुरस्कार’ मिळवला आहे.
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा सहकार प्रशिक्षण कार्यक्रम व वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. संस्थेची व्यवसायातील वाढ, ग्राहक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संचालक मंडळ, कर्मचारी, पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी यांच्या उत्कृष्ट सहकार्यामुळे हे साध्य झाले आहे. या सर्वांसह साथ देणारे संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट साध्य केल्याचे तिन्ही पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सांगितले.