सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या मालमत्तेचे रक्षण वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:55 AM2019-02-09T11:55:06+5:302019-02-09T11:56:20+5:30
भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंचायतीने तोडून नेले आहे. आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, कागदपत्र तपासण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
रत्नागिरी : भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंचायतीने तोडून नेले आहे. आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, कागदपत्र तपासण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
हा दुर्दैवी प्रकार चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घडला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सुभेदार विनोद वसंत कदम यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानावर सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.
सुभेदार विनोद कदम यांनी चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे सहा गुंठे जागा घेतली आहे. या जागेपलिकडे निवृत्त सैनिक शांताराम शिंदे यांचे घर आहे. त्यांच्या घरानजीक रस्ता असतानाही ग्रामपंचायतीने त्यांना विनोद कदम यांच्या जागेतून रस्ता काढून देण्यात आला आहे. शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा दिल्यामुळे ग्रामपंचायतीने घाई करून त्यांना कदम यांच्या जागेतून रस्ता काढून दिला आहे.
जवान विनोद कदम यांच्या जागेत ग्रामपंचायत दप्तरी रस्त्याची नोंद घालण्यात आली आहे. याबाबत कदम यांच्यावतीने माहितीच्या आधारात ग्रामपंचायतीकडे या रस्त्याबाबत माहिती विचारण्यात आली. मात्र, या जागेत रस्त्याची नोंद करताना आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींची पूर्तता झालेली नसल्याचे पुढे आले आहे.
ही जागा रस्त्यासाठी देणारे एक करारपत्र कदम कुटुंबाला मिळाले आहे. त्यावर विनोद कदम यांचे नाव व स्वाक्षरी आहे. मात्र, आपण अशी कोणतीही स्वाक्षरी केली नसल्याची बाजू विनोद कदम यांनी मांडली आहे. करारपत्राच्या बाँडपेपरवर जी तारीख आहे, त्यावेळी कदम हे काश्मीर सीमेवर कार्यरत होते. आपल्या जागी अन्य कोणीतरी स्वाक्षरी करून बनावट दस्तऐवज तयार केला असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
आपल्या जागेतून रस्त्याचे काम केले जात असल्याची माहिती कळल्यानंतर कदम काश्मीरमधून चिपळूणला दाखल झाले आणि त्यांनी आपल्या जागेला कुंपण घातले. ग्रामपंचायतीने आपल्या जागेत अतिक्रमण केले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे करण्यासाठी सोमवारी ते रत्नागिरीत दाखल झाले.
जिल्हाधिकारी यांनी चिपळूण प्रांताधिकारी यांना याबाबत माहिती घेण्याची सूचना केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ज्यावेळी कदम प्रांताधिकारी आणि चिपळूण पंचायत समितीचे गटविस्तार अधिकारी यांना भेटण्यासाठी गेले, त्यावेळेत ग्रामपंचायतीने त्यांच्या जागेवरील कुंपण तोडून नेले.
बुधवारी विनोद कदम यांनी जिल्हाधिकारी यांची पुन्हा भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली. आपली संमत्ती नसताना आपल्या जागेत रस्त्याची नोंद करून ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कागदपत्र पाहिल्यानंतर संतापलेल्या जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.
आक्रोश मीडियावर
सैनिकांबद्दलचा आक्रोश फक्त सोशल मीडियावर केला जातो. प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबियांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्या जागेत अतिक्रमण केले जाते. सर्वसामान्य माणसे सैनिकांबद्दलचे प्रेम फक्त मीडियावरच दाखवणार का, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.
आता धावाधाव सुरू
आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशामुळे करारपत्रावरील सही तपासण्याचे काम पंचायत समितीने हाती घेतले आहे. कदम यांच्या जागेचे तोडलेले कुंपण ग्रामपंचायतीमध्येच आहे. विस्तार अधिकारी आता ग्रामपंचायतीकडून माहिती घेत आहेत.