कोरोना अहवाल उशिरा मिळत असल्याने उपचाराला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:00+5:302021-04-27T04:32:00+5:30
रत्नागिरी : सध्या कोरोनाचे रुग्ण भरमसाट वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ॲन्टिजेन तसेच आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. ...
रत्नागिरी : सध्या कोरोनाचे रुग्ण भरमसाट वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ॲन्टिजेन तसेच आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. ॲन्टिजेन चाचण्यांचे अहवाल अर्ध्या तासात मिळतात. मात्र, आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल सहा-सात दिवस प्रलंबित राहत असल्याने पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचार होताना विलंब होत आहे. त्यामुळे काही वेळा रुग्ण गंभीर होत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १९ हजारापेक्षा अधिक झाली आहे. दिवसेंदिवस कोराेना रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने लसीकरणाबरोबरच चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जिल्हा रुग्णालयातील कोरोना लॅबमध्ये दिवसाला सुमारे १२०० चाचण्या होतात. परंतु आता चाचण्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक खासगी - शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता अनेक आजार असलेल्या रुग्णांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे आता चाचण्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात चाचण्यांसाठी एकच मशीन असल्याने दरदिवशी होणाऱ्या चाचण्यांचे अहवाल मिळणे अवघड होत आहे. काही वेळा सहा ते सात दिवस लागत आहेत.
अहवालाला उशीर होत असला तरी स्वॅब चाचणी केल्यानंतर त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तींना संसर्ग वाढू नये, ही खबरदारी घेऊन अहवाल मिळेपर्यंत त्या व्यक्तीने घरी अलगीकरणात राहावयाचे आहे. मात्र, चाचण्यांची संख्या वाढू लागल्याने आता एकाच मशीनवर सर्व जिल्ह्याच्या चाचण्या होत असल्याने चाचण्या होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अहवाल मिळेपर्यंत त्या व्यक्तीला घरातच राहावे लागत आहे. पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतरच त्या व्यक्तीवर पुढील उपचार होत असल्याने अहवाल येईपर्यंत त्याला प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तींचे अहवाल उशिरा मिळाल्यास त्यांचा त्रास काही वेळा वाढत आहे.
त्यामुळे सध्या आरटीपीसीआर ही चाचणी विश्वासार्ह असली तरी, त्याचे अहवाल सहा ते सात दिवसांपर्यंत रखडून राहत असल्याने अशा व्यक्तींना अहवाल येईपर्यंत घरातच अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणखी एका मशीनची उपलब्धता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
१६ लाखाच्या मशीनची प्रतीक्षा?
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक आरटीपीसीआर चाचणी मशीन जिल्हा शासकीय रुग्णालयात येणार असल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी झूम ॲपवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी, १६ लाखाची मशीन लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय या मशीनची प्रतीक्षा करीत आहे.