अनधिकृत बांधकामांवर कारवाईची रिपाइंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:07+5:302021-09-21T04:35:07+5:30
खेड : मुंबई-गोवा महामार्गालगत कशेडी ते परशुराम या विभागात अनधिकृतपणे इमारती व दुकानगाळे उभे करण्यात येत आहेत. या अनधिकृत ...
खेड : मुंबई-गोवा महामार्गालगत कशेडी ते परशुराम या विभागात अनधिकृतपणे इमारती व दुकानगाळे उभे करण्यात येत आहेत. या अनधिकृत बांधकामांसह दुकानांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी रिपाइंचे युवक तालुकाध्यक्ष विकास धुत्रे यांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आले आहे.
महामार्गावरील कशेडीपासून ४४ अंतरापर्यंतच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागा मालकांना मोबदला देण्यात आला. या जागा मालकांनी पर्यायी ठिकाण शोधत बांधकामेही केली आहेत. मात्र, काहीजण नियमांचे उल्लंघन करत महामार्गालगतच इमारतींसह दुकान गाळे उभे करत आहेत. या अनधिकृत बांधकामांमुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गालगत बेकायदेशीर इमारती व गाळे उभारले जात असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी मात्र अजूनही सुस्तच आहेत. या अधिकाऱ्यांनी महामार्गालगत उभ्या करण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतींसह गाळे तातडीने हटवावेत, तसेच महामार्गालगत सुरू असणारी बांधकामे रोखण्यात यावीत, अशी मागणीही केली आहे.
शहरातही मोक्याच्या ठिकाणी अनधिकृतपणे गाळे उभे करण्याचा सिलसिला सुरू आहे. नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात उभारलेल्या खोक्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. नगर परिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या खोक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.