बॉण्ड पेपरला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:07+5:302021-08-02T04:12:07+5:30
झाडी तोडण्याची मागणी रत्नागिरी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लाखो मजूर कार्यरत आहेत. पावसामुळे ग्रामीण मार्गावरील झाडी न ...
झाडी तोडण्याची मागणी
रत्नागिरी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लाखो मजूर कार्यरत आहेत. पावसामुळे ग्रामीण मार्गावरील झाडी न तोडल्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याने झाडी तोडण्याची मागणी जनतेतून होत आहे. यासाठी एमआरजीएस अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली जात आहे.
परवानगीची मागणी
रत्नागिरी : शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस घेण्यात येतात. परंतु, कोरोनामुळे क्लास घेण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन क्लासेससाठी वेळेची मर्यादा असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोचिंग क्लास सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
अणुस्कुरामार्गे वाहतूक
लांजा : लांजा एस. टी. आगारातून लांजा - पाचल अणुस्कुरामार्गे एस. टी. बस सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सोमवार दिनांक २ ऑगस्टपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील काही एस. टी. फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. हर्चे, खोरनिनको, साटवली, सापुचेतळे मार्गावर फेऱ्या सुरु केल्या जाणार आहेत.
अपघाताचा धोका
रत्नागिरी : शहरातील गोखले नाका येथे रस्त्याच्या मध्येच मोठा खड्डा पडला असून, छोट्या वाहनांना अपघाताचा धोका संभवत आहे. याठिकाणी पूर्वी पोलीस चौकी होती. परंतु त्याच मार्गावर आता खड्डा पडल्याने पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. शहरातील नागरिकांकडून येता-जाता खड्ड्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुख्यालयाचे वावडे
रत्नागिरी : अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे. शासन निर्णय असतानाही अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक यासह अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
हळदीचे बियाणे उपलब्ध
रत्नागिरी : शहरालगतच्या भाट्ये नारळ संशोधन केंद्रात हळदीचे बियाणे उपलब्ध आहे. जिल्ह्यात हळदीचे चांगल्या प्रकारे उत्पादन होत आहे. शासनाकडून हळदीचे बियाणे उपलब्ध केले जात नव्हते. हे लक्षात घेऊन भाट्ये नारळ संशोधन केंद्रात बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.
वाहतुकीत बदल
चिपळूण : तालुक्यातील कळकवणे-आकले-तिवरे रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे व दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. पिंपरी नाका ते पेढांबे नाका-खडपोली व वालोटी, आकले या पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. पुलाचे काम होईपर्यंत पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे.